Marathi e-Batmya

१५ वर्ष जुनी दुचाकी, कार, ट्रक वापरणं होणार महाग

मुंबईः प्रतिनिधी
तुमच्याकडे १५ वर्ष जुनी कार असेल आणि कारच्या नोंदणीचं नुतनीकरण पुढील वर्षी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण १५ वर्ष जुन्या कारची नोंदणी नूतनीकरण आता आठ पटीने महागणार आहे. एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला आजच्या तुलनेत आठ पट अधिक शुल्क भरावे लागेल. तसंच ट्रक आणि बसचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणासाठीही आठ पट अधिक शुल्क भरावे लागेल.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन प्रणाली पुढील वर्षापासून लागू करण्यासाठी सोमवारी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, नोंदणी नुतनीकरण शुल्क वाढवल्यामुळे जुनं वाहन वापरणं आता आपल्याला परवडणार नाही.
अधिसूचनेनुसार, १५ वर्ष जुन्या कारच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता ५ हजार रुपये भरावे लागतील. सध्या हे शुल्क ६०० रुपये आहे. त्याचप्रमाणे जुन्या दुचाकीच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी आता एक हजार रुपये मोजावे लागतील. हे शुल्क आता ३०० रुपये आहे.
त्याचप्रमाणे १५ वर्षांपेक्षा जुन्या बस आणि ट्रकचे फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरण करण्यासाठी १२ हजार ५०० रुपये लागतील. सध्या हे काम १५०० रुपयांमध्ये केले जात आहेत. फिटनेस सर्टिफिकेटचे नूतनीकरण करण्यास विलंब झालेल्या प्रत्येक दिवसासाठी ५० रुपये दंड आकारला जाणार आहे.
कार नोंदणीचे नूतनीकरण करण्यास विलंब केल्यास तुम्हाला दरमहा ३०० रुपये दंड आकारला जाईल. व्यावसायिक वाहनांच्या बाबतीत हा दंड दरमहा ५०० रुपये असेल. लोक जुनी वाहने ठेवण्याचा विचार करू नये म्हणून नोंदणी आणि फिटनेस नूतनीकरण शुल्क वाढवण्यात आले आहे.
आतापासून तुम्हाला १५ वर्षांनंतर दर पाच वर्षांनी तुमच्या कार नोंदणीचे नूतनीकरण करावे लागेल. त्याचप्रमाणे जेव्हा एखादे व्यावसायिक वाहन आठ वर्षांचे होईल, तेव्हा त्याचे फिटनेस प्रमाणपत्र दरवर्षी नूतनीकरण करावे लागेल.
वाहनांच्या मॅन्युअल आणि स्वयंचलित फिटनेस चाचणीच्या शुल्काचाही अधिसूचनेत उल्लेख आहे. सरकारला मॅन्युअल फिटनेस चाचणी रद्द करायची आहे. कारण त्यात घोटाळा होण्याची शक्यता आहे. व्हेईकल स्क्रॅपिंग योजनेअंतर्गत अशी चाचणी केंद्रे उघडण्याशी संबंधित निकषांची अधिसूचना जारी केली आहे.
दिल्ली आणि परिसरात या नवीन नियमाचा परिणाम दिसणार नाही. कारण या भागात आधीपासूनच १० वर्षांपेक्षा जुन्या डिझेल वाहनांवर आणि १५ वर्षांपेक्षा अधिक जुन्या पेट्रोल वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

Exit mobile version