Marathi e-Batmya

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी वर्षा गायकवाड यांना खासदार म्हणून लोकसभेत पाठविणार असल्याचा शब्द दिला. त्यानंतर भाजपानंतर या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर भाजपाने आज माजी सरकारी वकील तथा अॅड उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.

वास्तविक पाहता काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा बालेकिल्ला हा दक्षिण मध्य मुंबईतील धारावी हा विधानसभा मतदारसंघ आहे. तसेच राहुल गांधी यांनी याच धारावीतील लघुद्योगांच्या पाठबळावर चीनला औद्योगिक क्षेत्रात पराभूत करता येणार असे जाहिर केले होते. मात्र या मतदारसंघावर शिवसेना उबाठा गटाने दावा करत येथून शिवसेना उबाठा गटाचे सरचिटणीस अनिल देसाई यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. वास्तविक पाहता अनिल देसाई हे पहिल्यांदाज लोकसभा निवडणूकीला सामोरे जात आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे हे पुन्हा एकदा उभे आहेत. त्यामुळे शिंदे विरूध्द ठाकरे असा सामना या मतदारसंघात पाह्यला मिळणार आहे. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी हा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाला दिल्यावरून कुरकुर सुरु केली.

शेवटी काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांना मागील अनेक वर्षे भाजपाच्या ताब्यात असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहिर करण्यात आली. वास्तविक पाहता उत्तर मध्य मुंबई हा लोकसभा मतदारसंघ दलित बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातून रामदास आठवले यांनी जवळपास दोन दा निवडणूक लढविली होती. मात्र त्यांचा फार कमी मताधिक्क्याने पराभव झाला होता. मात्र प्रमोद महाजनांसाठी हा मतदारसंघ सोडल्यानंतर आतापर्यंत या मतदारसंघावर बहुतेकवेळा भाजपाने राज्य केले आहे. त्यामुळे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जाणीवपूर्वक माजी ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना उमेदवारी भाजपाने जाहिर केली.

दरम्यान, मुळ शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे विरूध्द ठाकरे अशी न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली. त्यावेळी उज्वल निकम यांनी उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत विश्वासमताला सामोरे जाण्या आधीच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता ही थोडीशी दुर्लक्षित राहिलेली न्यायालयीन लढ्याच्यादृष्टीने असलेली बाब मिडिया कोर्टाच्या माध्यमातून लक्षात आणून दिली होती. त्या मुद्याच्या आधारेच शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयात ठाकरे यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात शिंदे गटाला बाजी मारता आली होती. त्यामुळे त्या मुद्याची बक्षिसी म्हणूनच माजी सरकारी वकील उज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version