Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू

दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,  कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या महापौर रितू तावडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार संजय उपाध्याय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव अशी स्थानके असून, ही मेट्रो लाईन-७ शी जोडली गेल्याने प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान या मार्गाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले असून, याच वर्षात त्याचेही उद्घाटन करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सुमारे ६,६०७ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या एक ते दोन तास लागणारा प्रवास केवळ ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील टप्प्यांमध्ये ही मेट्रो लाईन-३ शी जोडली जाणार असून, मीराभाईंदर ते कुलाबा दरम्यान सीमलेस प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

मेट्रो सेवेत कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले असून, सध्या ८० टक्के तिकीट व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. स्मार्ट कार्ड आणि ‘वन कार्ड’ प्रणालीमुळे एकात्मिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळत आहे. हा प्रकल्प सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, एलईडी लाईटिंग आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग यांसारख्या तंत्रज्ञानामुळे हरित प्रकल्प ठरत आहे. तसेच नागपूरप्रमाणेच मेट्रो आणि फ्लायओव्हर एका पिलरवर उभारण्याची डबल डेकर रचना येथेही वापरण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. सध्या मुंबईत १०० किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून, देशात दिल्ली नंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. पुढील काही वर्षांत आणखी प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईतील मेट्रो जाळे अधिक विस्तारणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमएमआरडीए, संबंधित महानगरपालिका, कंत्राटदार आणि मजूर यांचे योगदानाबद्दल आभार मानून ही मेट्रो सेवा मुंबईकरांना समर्पित केली असल्याची घोषणा केली.

मुंबईएमएमआर कनेक्टिव्हिटीला मोठी चालना– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनामुळे मुंबई आणि एमएमआर परिसरातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली असून हा दिवस दहिसर व मीरा-भाईंदरमधील नागरिकांसाठी ऐतिहासिक ठरल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ही मेट्रो दहिसर स्थानकावरून मेट्रो 2A आणि मेट्रो 7 शी जोडली गेली असून पुढील काळात मेट्रो 7A, मेट्रो 3 द्वारे कुलाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट थेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात एकात्मिक मेट्रो जाळे तयार होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

राज्यातील मेट्रो नेटवर्क सध्या १०१ किलोमीटरपर्यंत पोहोचले असून भविष्यात ते ३३७ किलोमीटरपर्यंत विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. हे नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर मुंबईचे मेट्रो जाळे जगातील अग्रगण्य ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

मेट्रो प्रकल्पामुळे रस्त्यावरील वाहतूक २० ते ३० टक्क्यांनी कमी होईल, इंधन बचत होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. त्यामुळे कामकाजाची कार्यक्षमता वाढून नागरिकांना कुटुंबासाठी अधिक वेळ देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भूमी संपादन व पुनर्वसनासारखी आव्हाने पार करत शासनाने गतीने काम केल्याचे सांगून त्यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांचे अभिनंदन केले. हा लोकहिताचा प्रकल्प असून नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मुंबईकरांसाठी ही मेट्रो मोठी दिलासा देणारी ठरणार असून भविष्यात संपूर्ण एमएमआर परिसरातील प्रवास अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दहिसर पूर्व ते काशीगाव या मेट्रो ९ प्रकल्पाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवरांनी मेट्रोने प्रवास केला.

मेट्रो लाईन ९ (दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर)

* लांबी: १०.५ कि.मी. (उन्नत)

एकूण स्थानके:८

* स्थानाकांची नावे: दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागांव, काशिगांव, साई बाबा नगर, मंदितियानगर, शहीद भगत सिंग उद्यान आणि नेताजी सुभाष चंद्र बोस उद्यान

फेज १ (दहिसर ते काशीगांव):

कनेक्टिव्हिटी:

प्रवाशांसाठी सुविधा:

हरित गतिशीलता आणि उत्सर्जन घट

रस्त्यावरून रेल्वेकडे बदल: मेट्रो लाईन-९ उच्च क्षमतेची सार्वजनिक वाहतूक पुरवते, ज्यामुळे पूर्व उपनगरांमध्ये खाजगी वाहनांचा वापर, वाहतूक कोंडी, इंधनाचा वापर आणि वाहनांच्या एक्झॉस्ट पाईपमधून होणारे उत्सर्जन यामध्ये लक्षणीय घट होते.

कमी कार्बन फूटप्रिंट: रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत, इलेक्ट्रिक मेट्रोच्या संचालनामुळे प्रति प्रवासी-किमी CO₂ आणि सूक्ष्म कणांच्या उत्सर्जनात लक्षणीय घट होते.

ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली:

प्रवासी-केंद्रित शाश्वत रचना:

प्रकल्पाचे फायदे:

* प्रवाशांसाठी सुरक्षित, आरामदायक आणि सुलभ प्रवास.

* बहुविध वाहतुकीचे उत्कृष्ट एकीकरण (मल्टी मोडल इंटिग्रेशन).

* कार्बन उत्सर्जनात घट होईल.

* वाहतूक कोंडी कमी होईल.

* प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.

Exit mobile version