तळीरामांसाठी राज्य सरकाने मोठा निर्णय घेतला असून नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रात्रीपासून ते पहाटेपर्यंत आता दारूची दुकाने-बिअरबार खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई दारुबंदी कायदा, १९४९ अंतर्गत मुंबई विदेशी मद्य नियमावली १९५३ व महाराष्ट्र देशी मद्य नियमावली १९७३ अंतर्गत विविध तरतुदीनुसार मुंबई शहर जिल्ह्यातील किरकोळ, विदेशी मद्य विक्रीच्या दुकानांना बंद करावयाच्या वेळेत शिथिलता देण्यात आली आहे. ही शिथिलता २४,२५ व ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत देण्यात आली आहे, मुंबई शहराचा जिल्हाधिकारी संजय यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे
एफएल-२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान) रात्री १०.३० ते पहाटे १ वाजेपर्यंत, उच्च दर्जाची व अतिउच्च दर्जाची श्रेणीवाढ मिळालेल्या एफएल २ अनुज्ञप्ती यांना रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत, एफएलबीआर -२ आणि एफएलडब्ल्यू -२ यांना रात्री १०.३० वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत, एफएल-३ (परवाना कक्ष) एफ एल-४ (क्लब अनुज्ञप्ती) यांना पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री दीड ते पहाटे पाच वाजेपर्यंत आणि इतर क्षेत्राकरिता रात्री ११.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत शिथिल असणार आहे.
बिअर बार मध्यरात्री १२ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत, वाईन बार मध्यरात्री १२ वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत, ई-२ मध्यरात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शिथीलता असणार आहे.
सीएल -३ अनुज्ञप्ती यांना महानगरपालिका तसेच ‘अ’, व ‘ब’ वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत शिथिलता असणार आहे. ही वेळेची शिथिलता २४, २५ व ३१ डिसेंबर रोजी असेल, असे आदेशान्वये मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी कळविले आहे.
