Marathi e-Batmya

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे!

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरूवारी (दि. १४) नवीन विद्युत वाहने उपलब्ध झाले असून या ईव्ही वाहनांचा वापर देखील सुरु करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ ला अनुसरून महावितरणने पेट्रोल व डिझेल वाहनांऐवजी विद्युत वाहनांना प्राधान्य दिले आहे. पहिल्या टप्प्यात महावितरणच्या मुख्य व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विद्युत वाहनांच्या खरेदीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी विद्युत वाहनांचा याआधीच वापर सुरु केला आहे. गेल्या आठवड्याभरात आणखी १० विद्युत वाहने महावितरणच्या ताफ्यात दाखल झाले. या विद्युत वाहनांचा प्रादेशिक विभागांचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि सर्व कार्यकारी संचालकांनी नुकताच वापर सुरु केला आहे.

दरम्यान पंतप्रधान व मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उर्वरित विद्युत वाहनांच्या उपलब्धतेसाठी महावितरणकडून विशेष पाठपुरावा करण्यात आला. ही वाहने गुरुवारी (दि. १४) उपलब्ध झाली. त्यानंतर संचालक सचिन तालेवार (संचालन/प्रकल्प), अनुदीप दिघे (वित्त), योगेश गडकरी (वाणिज्य), राजेंद्र पवार (मानव संसाधन) यांनी देखील तात्काळ या विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे.

महावितरण अंतर्गत सर्व मुख्य अभियंता तसेच क्षेत्रीय अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागप्रमुख अभियंता यांच्या कार्यालयात देखील पेट्रोल किंवा डिझेलऐवजी फक्त विद्युत वाहनांचा वापर होईल याबाबतच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

Exit mobile version