Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल, सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान…

गरीब कष्ट करणार्‍यांनी मेरीटवर नोकर्‍या मिळवल्या आहेत. आठ महिने हक्काचा पगार त्यांना मिळत नाही. सगळ्या गोष्टी विकण्याचे एक कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्यातून महाराष्ट्राचे नुकसान होत आहे. हे अतिशय दुर्दैवी असून सातत्याने महाराष्ट्राला केंद्र सरकार जी वागणूक देत आहे त्या धोरणाचा जाहीर निषेध असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर केला.

एनटीसीच्या चार हजार गिरणी कामगारांना गेले आठ महिने हक्काचा पगार मिळाला नाही त्याबद्दल आज एनटीसी हाऊसच्या बाहेर कामगारांनी आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनिल तटकरे हे स्थानिक खासदार असताना बोलायला दिले नाही, याचे मला आश्चर्य वाटत नाही. स्थानिक लोकांचा आदर करण्याची पध्दत यांच्याकडे नाही. कुठे ही गेले तरी लोकांचा अपमानच करतात असा थेट हल्लाबोलही खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिंदे-फडणवीस सरकारवर केला.

तसेच सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र सदनात कार्यक्रम झाला तिथेही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा ज्या पध्दतीने हटवण्यात आला हे अतिशय दुर्दैवी आहे. महापुरुषांचा अपमान करणे किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचा अपमान करणे ही ईडी सरकारची पध्दत आहे आणि महाराष्ट्राचा अपमान कसा होईल त्याच्यातच केंद्र सरकारला आनंद मिळतो हे त्यांच्या वागणूकीतून दिसते असा टोलाही लगावला.

Exit mobile version