Marathi e-Batmya

भाजपाच्या ‘त्या’ व्हिडिओला शिवसेनेकडून फडणवीस, राज्यपालांच्या फोटोने प्रत्युत्तर

मागील काही दिवसांपासून याकूब मेनन यांच्या कबरीवरून भाजपा-शिवसेनेत सामना रंगला असतानाच याकूब मेनन याचा नातेवाईक रौफ मेमन याच्यासोबत मुंबई महापालिकेच्या तत्कालीन महापौर तथा शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर या मिटींग करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. या व्हिडिओवरून भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग यांच्यासोबतचे रौफ मेमन याचे फोटो दाखवित भाजपाला सवाल केला.

सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये किशोरी पेडणेकर आणि रौफ मेमन हे एका बैठकीत असल्याचं दिसत आहे. ही बैठक बडा कब्रिस्तानमध्ये झाली असून तिथे २० ते २५ लोक हजर होते, असा दावा भाजपाकडून करण्यात येत आहे.

मला वाटतं की हे फार चुकीचं आहे. ज्याच्याशी उद्धव ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही, तिथे संबंध जोडत आहेत, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी फडणवीस आणि राज्यपालांचे रौफ मेमनसोबतचे फोटो दाखवित म्हणाल्या, याला काय म्हणायचं? यालाही उत्तर द्या. राज्यपाल देखील स्वत: त्यांच्यासोबत आहेत. ही १२ तोंडं बोलतायत. फक्त आरोप करण्यासाठी भाजपानं बसवली आहेत. त्यांनी उत्तर द्यावं. एका मध्यमवर्गीय महिलेलाही तुम्ही नाही सोडत. मी कामाने मोठी झाले. मी तुमच्यासारखे मुंबईत छक्के-पंजे खेळले नाही. मला माहिती नाही ते. माझ्या कामावर आक्षेप असेल तर मला सांगा. हे फोटो तर कुणीही काढतं असेही त्या म्हणाल्या.

ही १२ तोंडं आता उठून बोलतायत. मी कधीही इतक्या मोठ्या राजकारणात गेली नाही. मी कब्रिस्तानाला भेट दिली नव्हती. मी सगळ्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या होत्या. त्यात हेही एक धार्मिक स्थळ होतं. राज पुरोहिताचा मुलगा आकाश पुरोहित हा देखील होता. तिथल्या पाणी व्यवस्थेची पाहणी करायला आम्ही गेलो होतो. राज्यपाल देखील रौफ मेमनला भेटले. याला काय म्हणणार? देवेंद्र फडणवीसही त्यांना भेटले. त्याला काय म्हणणार? जे बदनामीचं षडयंत्र तुम्ही करत आहात, त्या चिखलात तुम्हीच पडणार आहात, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

एका स्त्रीवर तुम्ही आक्षेप घेता. राजकारणातल्या स्त्रियाही तुम्ही नाही सोडणार. सत्ता मिळवा, पण काम करून मिळवा. तुमची विश्वासार्हता टिकवून मिळवा जी शिवसेनेनं अनेक वर्षांपासून मिळवली आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतोय असं तुम्ही सांगताय. हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार हे मुंबईकरांना कळतायत. फक्त मुंबई महानगर पालिका मिळवायचीये आणि नागपूर महापालिकेसारखीच मुंबईची अवस्था करून ठेवायचीये. पण हे मुंबईकर होऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे असेही त्या म्हणाल्या.

Exit mobile version