Marathi e-Batmya

आदिती तटकरे यांचे निर्देश, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणा करा

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

प्रोत्साहन भत्त्याच्या सुधारित निकषांबाबत कर्मचारी संघटनांच्या मागणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी आदी निकषांच्या आधारे प्रोत्साहन भत्ता निश्चित करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी बैठकीस एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर आदीसह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांच्या पोषणाची काळजी घेण्यासाठी १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार अनुक्रमे ₹१,५०० ते ₹२,००० आणि ₹५०० ते ₹१,००० प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आला आहे.

शेवटी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, यावेळी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात या योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सूचना दिल्या.

Exit mobile version