Marathi e-Batmya

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यावर टीका

मागील पाच दिवसापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले होते. तसेच मागील तीन-चार वेळेप्रमाणे राज्य सरकार ठोस निर्णय न घेता मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसणार का अशी चर्चा सुरु होती. मात्र राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या नुसत्याच ऐकून नाही घेतल्या तर त्या मागण्यांची पुर्तता करत मराठवाड्यातील मराठा समाजाचा कुणबी समाजात समावेश करत अप्रत्यक्ष ओबीसीतील आरक्षणातही वाटा दिला. त्यानंतर या आंदोलनाच्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तरीही फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी होती. पण त्यात कायदेशीर अडचण होत्या. ही बाब मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे यांच्या लक्षात आणून दिली व ते त्यांनी मान्य केल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हैद्राबाद गॅझेटच्या आधारावर आता नोंदी पडताळणी मराठा समाजाला कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देता येईल. पण ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे प्रमाणपत्र असल्याचा पुरावा असेल त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळणार आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला याचा फायदा होईल. दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही असा तोडगा आम्हाला काढायचा होता. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने यासंदर्भात अभ्यास करून या प्रश्नावर मार्ग काढला. या सर्वांचे श्रेय समितीला आहे. माझ्यावर टीका झाली तेव्हाही मी विचलित झालो नव्हतो, आताही होणार नाही. या समाजासाठी यापूर्वीही काम करीत होतो यापुढेही करत राहणार असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version