Marathi e-Batmya

अखेर किरीट सोमय्यांचा खोटेपणा अजित पवारांच्या वकीलांकडून उघड

मुंबई: प्रतिक्रिया

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जवळपास एक हजार कोटी रूपयांची मालमत्ता आयकर विभागाकडून सील करण्यात आल्याचे ट्विट भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी करत एकच खळबळ माजवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर संध्याकाळी अजित पवार यांचे वकील अॅड.प्रशांत पाटील यांनी अशी कोणतीही कारवाई किंवा टाच आणण्यात आल्याचा खुलासा करत खोडसाळपणाचे आणि परिस्थितीशी विसंगत असल्याचे एका प्रसिध्द पत्रकान्वये सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही किंवा त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमात येत असलेले वृत्त निराधार, वस्तुस्थितीशी विसंगत, खोडसाळपणाचे असल्याचे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसारीत होत असलेल्या बातम्यांचे खंडन करताना त्यांचे वकील ॲड. प्रशांत पाटील यांनी अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच आलेली नाही किंवा त्यासंदर्भात नोटीसही बजावण्यात आलेली नाही. आयकर विभागाकडून काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. त्या पत्राला योग्य ते उत्तर देण्यात येईल. प्रशासकीय आणि कायदेशीर मार्गाने योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रसिद्धीमाध्यमांनी वस्तुस्थिती तपासून बातम्या द्याव्यात व कुठलाही अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही अजित पवार यांच्या वकिलांतर्फे करण्यात आले आहे.

त्यामुळे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले ते ट्विट खोटे असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच आयकर विभागाच्या ट्विटर हॅण्डल आणि वेबसाईटवर अशी कोणतीही कारवाई केल्याची माहिती प्रसिध्द करण्यात आलेली नाही.

Exit mobile version