Marathi e-Batmya

जात वैधतेच्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवाहन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या, मात्र अद्याप जात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र पडताळणीसंदर्भातील त्रुटींची तातडीने पूर्तता करावी, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आले आहे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहू नये, या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येत आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागांतर्गत विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या ज्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे प्रकरण निर्णयाधीन आहे, अशा विद्यार्थ्यांना संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत एसएमएस, ई-मेल आणि पत्राद्वारे त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही अनेक विद्यार्थ्यांनी संबंधित समित्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जदार लॉगीनद्वारे ऑनलाइन पद्धतीने प्रलंबित त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्रुटींचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित अर्जदारांची राहणार आहे. प्रवेशाची संधी अबाधित ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी या प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणताही विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी.

विद्यार्थ्यांना सुलभतेने मार्गदर्शन व तांत्रिक सहाय्य उपलब्ध व्हावे, यासाठी बार्टीमार्फत स्वतंत्र हेल्पडेस्कची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी https://www.cvc.barti.in/ या नवीन पोर्टलचा वापर करावा. तसेच शंका निरसन व मदतीसाठी बार्टी हेल्पडेस्क दूरध्वनी क्रमांक ०२०-२६३३३३३९, व्हॉट्सॲप क्रमांक ९४०४९९९४५२ (केवळ संदेशासाठी) आणि helpdesk@barti.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

नवीन पोर्टल व हेल्पडेस्क सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातील प्रलंबित कार्यवाही तातडीने पूर्ण करावी आणि प्रवेशप्रक्रियेत उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी टाळाव्यात, असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेच्या महासंचालक तथा महाराष्ट्र राज्यातील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

Exit mobile version