मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीत पुन्हा एकदा एकहाती विजय मिळल्यावर पंतप्रधान पदी हुकूमशाही पध्दतीने वागणाऱे नरेंद्र मोदी यांची वर्णी लागू नये यासाठी पुरोगामी विचाराच्या पक्षांना मदत करण्याची भूमिका पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येत आहे. परंतु पुरोगामी पक्षातीलच नेते आता पक्षात येत असल्याने मोदींना रोखण्यासाठी कोणाला मदत करायची असा उद्विग्न सवाल भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर करत भाजपमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे सुचित केले.
मागील निवडणूकीच्यावेळी काँग्रेस आघाडीखालील केंद्रातील सरकारला सत्तेतून खाली खेचून जनतेच्या भल्यासाठी काही चांगले करण्याची भूमिका भाजपकडून स्विकारण्यात आली होती. परंतु नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदी विराजमान होताच त्यांनी हुकूमशाही आणि एककल्ली पध्दतीने देशाचा कारभार हाकण्यास सुरुवात केली. देशात आणि पक्षात दहशतीचे वातावरण सुरु केल्याने पक्षांतर्गत तसेच देशातील संसदीय लोकशाही धोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
भारतररत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसभेत भाषण करताना सांगितले होते की, राज्यघटना अस्तित्वात आल्याने देशात राजकिय समता आलेली आहे. परंतु सामाजिक समता येणे गरजेचे आहे. जर ही देशात सामाजिक आणि आर्थिक स्तरावर समता आणण्यास सत्ताधाऱ्यांना अपयश आले तर देश हुकूमशाही पध्दतीकडे जाईल. आताची परिस्थिती डॉ. आंबेडकरांनी सांगितली तशीच निर्माण झाली असून पुन्हा मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यास सामाजिक, आर्थिक सोडाच राजकिय समताही धोक्यात येईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक उदारीकरणानंतर देशात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. तसेच नवे उद्योजकही तयार झाले. मात्र हिंदूत्वाच्या नावाखाली हे सर्व उद्योजक पक्षाच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे. याला प्रसारमाध्यमेही अपवाद नाहीत. त्यामुळे इथुन पुढे जो कोणी भाजपच्या आणि मोदींच्या विरोधात लिहील त्याची आर्थिकसह सर्वचस्तरावर जलदगतीने नाकेबंदी करण्याचे काम केले जाईल अशी भीतीही व्यक्त केली.
देशातील सामाजिक, आर्थिक, राजकिय स्थिती बिघडत चालली आहे. विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना पक्षवाढीच्या नावाखाली ब्लँकमेल करून पक्षात आणले जात आहे. त्यामुळे भाजपमधील तत्वावर आधारीत राजकारण संपुष्टात आले असून केवळ सत्ता आणि पैसा याभोवती राजकारण सुरु झाल्याचे सांगत मोदींना सत्तेत येण्यापासून रोखल्याशिवाय लोकशाही जीवंत राहणार नसल्याचे प्रतिपादन केले.
मोदींना रोखण्यासाठी ज्यांना मदत करायचीय तेच भाजपात येतायत
