मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षात विकासाच्या नावाखाली पक्षांतर करण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र एका राजघराण्यातील जावयाला यंदाच्या निवडणूकीत तिकिट देता यावे यासाठी भाजपाच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे ४ टर्म अर्थात २० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या निष्ठावंत आमदाराला घरचा रस्ता दाखविणार असल्याची माहिती भाजपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबईतून संभावित उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीला कुलाब्याचे विद्यमान आमदारही उपस्थित होते. मात्र कुलाब्याच्या निष्ठावंत आमदारासमोरच यंदा या मतदारसंघातून दुसऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी अध्यक्ष मंगळ प्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केली. त्यावर विद्यमान आमदाराने यास विरोध दर्शविला. तसेच आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या आमदाराला खोली बाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे चिडून जावून सदर आमदाराने बाहेरचा रस्ता धरल्याची माहिती या बैठकीला उपस्थित असलेल्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील एका राजघरण्यातील प्रतिष्ठित व्यक्ती आणि त्यांच्या जावयासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ८ ते १६ सप्टेंबर २०१९ याकालावधीत वर्षा निवासस्थानी भेट घेत जावयाच्या उमेदवारी संदर्भात चर्चा केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राजघराण्याच्या जावयाला कुलाब्यातून उमेदवारी देण्याची तयारी दर्शविली. या दोन्ही बैठकीला विशेष म्हणजे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे हजर होती असेही त्यांनी सांगितले.
भाजपात बाहेरून येणाऱ्यांसाठी नेहमीच पायघड्या घालण्यात येत असून निष्ठावंतांसाठी मात्र फक्त सतरंज्या उचलायचे काम शिल्लक राहीले असल्याची खंत भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली.
राजघराण्याच्या जावयासाठी कुलाब्याच्या निष्ठावंत आमदाराला नारळ ?
