Marathi e-Batmya

समृध्दीच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे सूचक वक्तव्य, प्रकल्प होऊ नये यासाठी प्रयत्न..

नागपूर-मुंबईला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी एक्सप्रेस वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पास विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधत सूचक विधान केले. त्यामुळे समृध्दी महामार्गावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रकल्पासाठी जमिन दे‌ऊ दिली नसल्याच्या चर्चेला सुरुवात झाली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं आज उद्घाटन झालं असून पुढील वर्षभरात दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण होणार आहे. या महामार्गासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले आहे. मात्र, त्याचवेळी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांनी प्रकल्प होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचेही सूचक वक्तव्य केले.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचंही आज भूमिपूजन झालंय. आणखी काही कार्यक्रम होत आहेत. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा हा क्षण माझ्यासाठी फक्त स्वप्नपूर्तीचा नाही, तर अभिमानाचा, गर्वाचा आहे. अभिमान यासाठी की या कार्यक्रमाला देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. आनंद याचा आहे की देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय. या महामार्गाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव आम्ही दिलंय याचाही मोठा आनंद आहे, असल्याचे सांगितले.

एकनाथ शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अनेक बैठका झाल्याचं सूचक विधान केलं. आज मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचं लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या, असं सांगत एकनाथ शिंदेंनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या भाषणातही आधीच्या सरकारने जमिनी देऊ नका म्हणून प्रयत्न केल्याचा उल्लेख केला होता.

अनेक लोकांनी प्रयत्न केले. पण मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं. इतिहासात असं दुर्मिळ असतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रकल्पावर काम करणारे सगळे लोक सोबत होते. शेतकऱ्यांना वाटलं की त्यांचे पैसे मिळतील की नाही. पण आम्ही आरटीजीएसच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात पैसे जमा केले. त्यांच्यात विश्वास निर्माण केला. याला विशेष प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यामुळे जमीन अधिग्रहण हा सगळ्यात मोठा टप्पा विक्रमी वेळेत पूर्ण केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

शिर्डी ते मुंबई या दुसऱ्या टप्प्याचंही लोकार्पण पुढच्या वर्षभरात होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. हा मार्ग शिर्डीपर्यंत पोहोचला आहे. पुढच्या ८-१० महिन्यांत तो मुंबईपर्यंत पोहोचणार आहे. हा महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा बदलणारा ठरणार आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूला आपण अनेक प्रकारचे नवनगर वसणार आहोत. अनेक उद्योग तिथे येतील. लाखो लोकांना रोजगार देणारा समृद्धी महामार्ग ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Exit mobile version