Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, त्या घटनेने मुंबई असुरक्षित म्हणता येणार नाही

बांद्रा येथील पाली हिल येथे राहत असलेल्या बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्या घरी एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ अली खान यांने त्या अज्ञात व्यक्तीस अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या झटापटीत अभिनेता सैफ अली खान गंभीररित्या जखमी झाला.

या घटनेनंतर राजकिय क्षेत्रातील अनेक पक्षांच्या नेत्यांनी राज्यातील ढासळत्या कायदा व सुव्यस्थेप्रश्नी प्रश्न उपस्थित करत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. मात्र विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना या घटनेमुळे मुंबई असुरक्षित आहे असे म्हणता येणार नाही असे सांगत विरोधकांच्या आरोपाला केराची टोपली दाखविली.

मागील वर्षभरात बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांना धमक्या देत आहेत. तसेच सलमान खान याच्या घरासमोर पहाटेच्या वेळी हवेत गोळीबार करण्यात आला. त्यानंतर बॉलीवूडशी जोडले गेलेले आणि सलमान खान-शाहरूख खान यांच्याशी घरगुती संबध असलेले राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांचा खूनही बांद्रा परिसरात झाला. त्यानंतर आज मध्यरात्रीनंतर या नव्या महायुतीच्या सरकारला राज्यात विराजमान होऊन महिना उलटून गेला नाही तोच बॉलीवू़ड अभिनेता सैफ अली खान याच्यावर अज्ञात इसमाने हल्ला केल्याची घटना घडली.

यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संपर्क साधून सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारले असता म्हणाले की, विरोधकांकडून विनाकारण कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण केला जात आहे. तसेच मुंबई असुरक्षित असल्याचा आरोप करत आहेत. मात्र या हल्ल्यामुळे मुंबई असुरक्षित झाली असे म्हणता येणार नाही असे सांगत विरोधकांच्या आरोपाला केराची टोपली दाखवली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील मेगासिटींचा विचार केला तर मुंबई हे फारच सुरक्षित असलेले शहर आहे. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असून या संदर्भात तपासही करण्यात येत आहे. त्याचबरोबर ही घटना आणि हल्ला कशामुळे झाला याची माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांनाही दिली आहे. त्यामुळे मुंबई असुरक्षित आहे असे कदापी म्हणता येणार नाही असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version