Marathi e-Batmya

जोडे मारो आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलीय

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यातील महायुतीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात शिवद्रोही, खोके सरकार, गद्दारांचे सरकार अशा घोषणा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्यात जास्तीत प्रसिध्द होत आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी होत असल्याची टीकाही यावेळी केली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधक विसरले आहे की, दोन वर्षापूर्वी राज्यातील जनतेने त्यांना सत्तेतून बाहेर फेकून दिले आहे. तरीही ते आम्हालाच गेट ऑऊट ऑफ इंडिया म्हणून आमच्यावर टीका करत आहेत. महाविकास आघाडीचे आंदोलन पुर्णपणे राजकीय हेतून प्रेरित आहे. त्यांचे शिवाजी महाराजांबद्दल आदर नाही. केवळ राजकारण करायचे आहे. शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याबद्दल आमच्याही मनात दुःख आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली, मुख्यमंत्री म्हणून मी आणि उपमुख्यमंत्र्यांनीही माफी मागितली असताना हे आंदोलन कशासाठी असा सवालही यावेळी केला.

दरम्यान, राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने काढलेला मोर्चा चांगल्यापैकी यशस्वी झाल्याने महायुती सरकारच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीत महायुती सरकारला चांगलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Exit mobile version