मागील काही वर्षात राज्यातील गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर सर्वाधिक गुन्हे हे महिलांवरील अत्याचाराचे, विनयभंगाचे असल्याची कबुली दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत देशात महाराष्ट्रातील गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार आठव्या स्थानावर आहे. तर पहिल्या १० शहरांमध्ये नागपूरचा समावेश आहे. तर मुंबई १५ व्या स्थानी तर पुणे १८ व्या स्थानावर असल्याची माहिती आज विधानसभेत दिली.
विधानसभेत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात गृह विभागाच्या अनुदान मागण्यांना मंजुरी देण्यात आली. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर दंगलीबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. नागपूरची घटना पूर्वनियोजित होती. नागपूर पोलिस आयुक्तांनी यावर वेगळे मत व्यक्त केलेले नाही. त्यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतरच आम्ही सभागृहाला माहिती दिली. नागपूर हे एक शांत शहर आहे. १९९२ पासून नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. काही लोकांनी जाणूनबुजून ही घटना घडवून आणल्याचा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. औरंगजेबाची प्रतीकात्मक कबर जाळण्यात आली, पण त्यावर एकही आयात लिहिलेला नव्हता. असे असूनही, आयात जाळण्यात आल्याची प्रचार करण्यात आला. अशा परिस्थितीत या प्रकरणात स्वतंत्र कारवाई केली जाईल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसमोर अनेक आव्हाने आहेत. या आव्हानांना तोंड देताना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखली जाईल असा विश्वासही व्यक्त केला.
गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकूण गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र संपूर्ण देशात आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापूर्वी, दिल्ली, केरळ, हरियाणा, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि ओरिसा हे क्रमांक आहेत. गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्रातील एकाही शहराचा पहिल्या पाच शहरांमध्ये समावेश नाही. नागपूरचे नाव पहिल्या १० शहरांमध्ये समाविष्ट आहे, याचे कारण म्हणजे नागपूर ग्रामीणचा २५ टक्के भाग नागपूरमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या डेटामध्ये लोकसंख्या समाविष्ट नाही. जर त्यात २०११ च्या लोकसंख्येचा डेटा समाविष्ट केला तर नागपूर २० किंवा २२ व्या क्रमांकावर येईल.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईसारखे महानगर १५ व्या स्थानावर आहे आणि पुणे १८ व्या स्थानावर आहे. गुन्ह्यांमध्ये, दिल्ली पहिल्या क्रमांकावर, जयपूर दुसऱ्या क्रमांकावर, इंदूर तिसऱ्या क्रमांकावर, कोची चौथ्या क्रमांकावर, पटना पाचव्या क्रमांकावर, त्यानंतर लखनौ, गाझियाबाद आणि कोझिकोडे शहराचा क्रमांक लागत असल्याचेही यावेळी सांगितले.
आता महिला बोलत आहेत
शेवटी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये गुन्ह्यांची संख्या २५८६ ने कमी झाली आहे. खून, चोरी, दरोडा यासारख्या घटना कमी झाल्या आहेत, परंतु बलात्कार, विनयभंगाच्या घटना वाढल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे, पण दुसरीकडे समाधानकारक आहे. पूर्वी, सामाजिक दबावामुळे, महिला अशा घटना नोंदवत नव्हत्या, पण आता महिला बोलू लागल्या आहेत. २०१३ च्या निर्भया घटनेनंतर गुन्ह्याची व्याख्या बदलली आहे. पूर्वी विनयभंगाच्या प्रकरणांमध्ये आता बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. आता ६० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल केले जात आहे. भारतीय न्यायिक संहितेत गतिमानता आणि शिक्षेला चालना देण्यासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच ऑपरेशन स्माइल २०१५ मध्ये सुरू करण्यात आले. २०२३ पर्यंत १२ ऑपरेशन्स करण्यात आल्या आणि आतापर्यंत ३८ हजार ९१० मुले सापडली आणि त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे सांगत या मोहिमेचे देशभर कौतुक झाल्याची माहितीही यावेळी दिली.
कायदा-सुव्यवस्था, महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, गतिमान न्यायप्रणाली, अंमली पदार्थ आणि पोलीस भरती संबंधित विविध प्रश्नांवर विधानसभेत एकत्रित उत्तर.
(विधानसभा, मुंबई | दि. 19 मार्च 2025)#Maharashtra #Mumbai #MahaBudgetSession2025 pic.twitter.com/MTmcLEZanU
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 19, 2025
