Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधांवर भर

नागपुरात व्यापक स्तरावर क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येत आहे. या सोयी-सुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नागपुरात आयोजित खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. कविवर्य सुरेश भट सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संजय भेंडे, अरुण लखानी, महापौर नीता ठाकरे, क्रीडा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित होत असलेल्या क्रीडा महोत्सवाचा प्रतिसाद सातत्याने वाढत असून अनेक खेळाडूंना यानिमित्ताने संधी आणि प्रशिक्षण उपलब्ध होत आहेत. या माध्यमातून नागपुरात एक क्रीडा संस्कृती आकारास येत आहे. क्रीडा क्षेत्र हे सातत्याने बदलत असून अभ्यासासोबतच आता क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळविण्यावरही मोठा भर दिला जात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यावसायिकता आली आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या क्षेत्रातील दालने उपलब्ध झाली आहेत. खेळ ही अशी संस्कृती आहे ज्यामुळे युवा पिढी योग्य दिशेने वाटचाल करू शकते. त्यातून स्पर्धात्मक वृत्ती देखील तयार होत असल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नागपुरात क्रीडा संस्कृतीला आणखी चालना देण्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. देशातील अत्यंत आधुनिक असे क्रीडा संकुल मानकापुरात तयार होत आहे. यानिमित्ताने येथे जागतिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन देखील करता येईल. क्रीडा विद्यापीठ देखील तयार होत आहे. एकूणच या सोयीसुविधांमुळे क्रीडा क्षेत्रात मनुष्यबळ तयार होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

आगामी खासदार क्रीडा महोत्सव विदर्भस्तरीय- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

आगामी खासदार महोत्सवाचे आयोजन व्यापक स्तरावर म्हणजेच विदर्भस्तरावर केले जाईल. त्यात एक लाखावर खेळाडू सहभागी होतील असे प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

नागपूर हे क्रीडा राजधानी म्हणून उदयास यावे यासाठी शहरातील क्रीडा सुविधा मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहेत. शहरात किमान २५ जलतरण तलाव तयार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शहराच्या सर्वच भागात क्रीडा सुविधांची उभारणी होणार असून शहरातील किमान एक लाख मुले-मुली सायंकाळी क्रीडा मैदानावर दिसावीत, असे आमचे स्वप्न असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सांगितले.

आगामी दहा वर्षात क्रीडा क्षेत्राला मोठी गती मिळणार – -केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

देशभरात एक उद्दिष्ट घेऊन क्रीडा क्षेत्रात काम सुरू आहे. २०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत व त्यासाठी मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्रातील संसाधने वाढविण्यावर भर दिला जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.

हा केवळ आठ दिवसाचा महोत्सव नसून क्रीडा क्षेत्रातील भविष्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. अनेक क्रीडा प्रकारात महाराष्ट्र आघाडीवर असून हे चित्र नक्कीच सुखावणारे आहे. देशांतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पहिल्या तीनमध्ये दिसून येतो, ही अभिमानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्रात अनेक रोजगारांच्या संधीही उपलब्ध झाल्याचे असल्याचे त्या म्हणाल्या.

जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी ४५ कोटींची तरतूद – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर जिल्ह्यातील क्रीडा सुविधांसाठी सुमारे ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. खासदार क्रीडा स्पर्धांच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजक समितीचे अभिनंदन केले.

१४ खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान

विविध क्रीडा प्रकारांतील १४ खेळाडूंना ‘खासदार क्रीडा भूषण पुरस्कार तसेच विशेष पुरस्कार प्रदान मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. व्हॉलीबॉल : कर्मण्य चिलकुलवार, अॅथलेटिक्स : अंजली मडावी, खो-खो : सिद्धेश सातपुते , सॉफ्टबॉल : उर्वशी सनेश्वर, हँडबॉल : हरप्रीतसिंग रंधावा, कबड्डी : मंगला ढबाले , स्केटिंग : अदिती धांडे, बुद्धिबळ : श्रद्धा बजाज, कुस्ती : नंदिनी साहू, बॅडमिंटन : निशिका गोखे, योगासन : भरत डेलिकर , बास्केटबॉल : गुंजन मंत्री , जिम्नॅस्टिक : अवनी राठोड, जलतरण : अदित्री पयासी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यंदा काही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात उत्कृष्ट संघटक पुरस्कार विजय डांगरे यांना तर उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार रवींद्र टोंग यांना तसेच क्रीडा सेवक पुरस्कार उमेश नायडू आणि उत्कृष्ट क्रीडा मंडळ म्हणून यंग मुस्लिम फुटबॉल क्लब यांना गौरविण्यात आले.

Exit mobile version