Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारवर कडक कारवाई

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कडक कारवाई  करण्याबाबत कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा व डान्सबारविरुद्ध कारवाई करण्याचा मुद्दा आमदार सुभाष देशमुख यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की, ऑर्केस्ट्राबारच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार चालवले जातात. अशा ठिकाणी कारवाई केल्यानंतरही पुन्हा त्याच प्रकारे व्यवसाय सुरु केला जातो. त्यामुळे राज्य शासनाने ठरवले आहे की तीन वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद कायद्यात करण्यात येईल. या अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती प्रस्तावित केली जाईल.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिले आहेत. राज्य शासनाने विविध वेळा कायदे आणि नियम तयार केले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या. तरीदेखील राज्य शासनाने नव्याने नियम आखले असून त्यानुसार ऑर्केस्ट्रा बार चालवण्यासाठी विशिष्ट जागा, पार्टीशन, अल्कोहोलवरील निर्बंध आदी अटी घालण्यात आल्या असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पनवेल येथील प्रकरणाची तपासणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनी सहभाग घेतला.

 

Exit mobile version