Marathi e-Batmya

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, देशातील पहिल्या कचरामुक्त शहराची संकल्पना साकार

देशातील पहिला एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन २८ टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भांडेवाडी परिसरात केवा सुस बडे या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहातर्फे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रकल्पाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीना हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दानी, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, केवा सुसबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर, फायनान्स डायरेक्टर विनोद तणदोन, उपाध्यक्ष विजय चिपळूणकर तसेच लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्र तीन टप्प्यात पूर्ण होणार असून येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत शहरातील १ हजार २०० मेट्रिक टन कचऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया अत्यंत आधुनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी ओला व सुका कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर बायोगॅस, कंपोस्ट खत तसेच सुक्या कचऱ्यापासून पावर प्लेट्स इंधन तयार होणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ३० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली असून गॅस विक्रीतून महानगरपालिकेला दरवर्षी १५ लाख रुपयांची रॉयल्टी सुद्धा मिळणार आहे. पर्यावरण पूरक या प्रकल्पासाठी प्रशासनातर्फे आवश्यक सहकार्य करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एकिकृत शहर घनकचरा प्रक्रिया केंद्रामुळे पुढच्या काळात शहरातील सर्व कचऱ्यावर प्रक्रिया सुलभ होणार असून नागपूर शहर हे घनकचरा व्यवस्थापन तसेच कचरा मुक्त शहर म्हणून संपूर्ण भारतात ओळखले जाईल. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नसल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या बायोगॅस वर शहरातील १९८ बसेस साठी सीएनजी ही ग्रीन एनर्जी उपलब्ध होणार आहे. खासगी भागीदारी तत्त्वावर सुरू होणाऱ्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला कुठलाही खर्च येणार नसून शहरात निर्माण होणाऱ्या १ हजार ३०० मेट्रिक टन कचरा व्यवस्थापनावर होणारा दैनंदिन खर्च वाचणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत तयार होईल. महाजनको साठी लागणाऱ्या एनर्जी प्लेट्स सुद्धा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, कचऱ्यापासून खत व खतापासून बायोगॅस, कंपोस्ट खत, पॉवर प्लेट्स आदी निर्माण करणारा हा प्रकल्प अत्याधुनिक असल्यामुळे पर्यावरणासाठी आदर्श प्रकल्प म्हणून संपूर्ण भारतात ओळखल्या जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी केवा सुजबडे या प्रकल्पाच्या कार्यकारी संचालक रुंदा ठाकूर यांनी संपूर्ण प्रकल्पाची व घनकचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रिये संदर्भात माहिती दिली. महापौर नीता ठाकरे व महापालिका आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी या प्रकल्पासाठी महानगरपालिकेतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

Exit mobile version