Marathi e-Batmya

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माकपच्या नेत्यांनी शरद पवार यांची घेतली भेट

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक निकालात जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपाचा अजिंक्य अश्व मध्ये रोखला गेला. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांच्या कालावधी शिल्लक राहिलेला असताना आज १५ जून २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याच्या प्रतिनिधी मंडळात डॉ. अशोक ढवळे, डॉ. उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, माजी आमदार जे. पी. गावीत, आ. विनोद निकोले, डॉ. डी. एल. कराड, डॉ. अजित नवले, एम. एच. शेख, व डॉ. सुभाष जाधव आदीजण उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीत मार्क्सवादी पक्ष यापूर्वीच सहभागी झालेला असून राज्यात मात्र राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा आणि काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती. मात्र आता विधानसभा निवडणूकीला काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही गतवेळेप्रमाणे विधानसभा निवडणूकीत आपले उमेदवार उभे करण्याची तयारी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत माकपने सहभागी होत राज्यात २५ जागा लढविण्याचा प्रस्ताव शरद पवार यांच्याबरोबरील बैठकीत देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत ५५ मिनिटे चर्चा केली. माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या २५ विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली. पर्यायी धोरणे, जाहीरनामा व निवडणूक रणनीती याबाबतही शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली.

दूध प्रश्नाबाबत हस्तक्षेप करण्याची आवश्यकता शरद पवार यांनी प्रकर्षाने व्यक्त केली. येत्या विधानसभा सत्रावर कामगारांच्या मोर्चाची चर्चा झाली. तसेच लवकरच महाविकास आघाडीच्या इतर सर्व प्रमुख नेत्यांना माकपचे प्रतिनिधीमंडळ लवकरच भेटणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Exit mobile version