Marathi e-Batmya

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्ता हवी होती म्हणून परिवर्तन केलं नाही तर…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या आमदारांना सुरुवातीला सूरत मध्ये आसरा देण्यात आला. तेथून हे सर्व जण भाजपाशासित आसाम आणि गोवा येथे गेले. त्यावेळी या फुटीमागे भाजपा नसल्याचे त्यांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र यामागे भाजपाच असल्याची चर्चा प्रसारमाध्यमात होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता परिवर्तन का केले? ही फूट का पाडली यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध उत्तरे दिली.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले, माझं वजन किती कमी झालंय? हे मला माहीत नाही. पण मी माझ्या टेलरला टाइट केलं आहे. त्यामुळे त्याने माझे कपडे असे शिवायला सुरू केले, ज्यामुळे माझं वजन कमी दिसतं अशी मिश्किल टिपण्णी केली.

राजकीय वजनावर भाष्य करता देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात तुम्ही कोणत्या पदावर आहात, यावरून तुमचं वजन ठरत नाही. तुम्ही स्वत: काय आहात, याच्या आधारावर तुमचं राजकीय वजन ठरवलं जातं. त्यामुळे महाराष्ट्रात कुणालाही विचारा की, माझं राजकीय वजन कमी झालं की जास्त झालं? अशी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे जेवढ्या जबाबदाऱ्या नव्हत्या, त्याहून अधिक विभागाच्या जबाबदाऱ्या सध्या तुमच्याकडे आहेत. राज्यातील सर्व काम तुमच्याकडून करून घेतलं जातंय, पण मुख्यमंत्रीपदी दुसरं कुणीतरी बसलंय, असं आम्ही मानायचं का? कारण राज्यात तसाच संदेश जातोय, असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, जे लोकं बाहेरून सरकारकडे पाहतात, त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे. कारण मी यापूर्वी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. आता मला केवळ सहा विभागाचं काम पाहावं लागतं. पण मुख्यमंत्र्यांना सर्व विभागांची कामं पाहावी लागतात. कारण ‘रुल्स ऑफ बिझनेस’नुसार जवळपास सर्वच विभागांची कागदपत्रे मुख्ममंत्र्यांकडे जातात असेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, पालकमंत्री म्हणून माझ्याकडे सहा जिल्ह्यांचीच जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांकडे सर्व जिल्ह्यांची जबाबदारी असते. पण आमच्या सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर माझ्याकडील जबाबदाऱ्या इतर मंत्र्यांकडे दिल्या जातील. पण माझं असं मत आहे की, सरकार चालवणं हा सामूहिक प्रयत्न असतो. त्यामुळे माझ्यावर खूप जास्त जबाबदाऱ्या आहेत, असं मला वाटत नाही. याउलट मी या जबाबदाऱ्यांचा आनंद घेतोय, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले. मात्र, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि त्यानंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा निर्णय घेतल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही राज्यातील महत्त्वाचे नेते आहात. तसेच तुम्ही यापूर्ण मुख्यमंत्रीही राहिले आहात. त्यामुळे आम्हाला सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आज जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा मला हा निर्णय योग्य वाटतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विकसित भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले आहे. ते स्वप्न महाराष्ट्राशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जर भारताला ५ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था बनवायची असेल, तर महाराष्ट्राला १ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा टप्प्यापर्यंत पोहोचावे लागेल. त्याशिवाय हे शक्य नाही. देशातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा आमचा उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version