Marathi e-Batmya

परिचारक आणि मुंडेच्या निलंबनावरून शिवसेना- भाजप आमने-सामने

मुंबई : प्रतिनिधी

विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीवरून भाजपने विधानसभा डोक्यावर घेतले. मात्र त्यांच्या मागणीला शिवसेनेने प्रतित्तुर देत भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांचे मागे घेण्यात आलेले निलंबन रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर दिल्याने परिचारक आणि मुंडे यांच्या मागणीवरून भाजप-शिवसेना आमने सामने आल्याचे दृष्य पाह्यला मिळाले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात प्रश्न लावण्यासंदर्भात एका व्यक्तीकडे लाच मागितल्याचे वृत्त एका दूरचित्रवाहीने काल संध्याकाळी प्रसारीत केले. तो धागा पकडत विधानसभेचे नियमित कामकाज सुरु होताच भाजपच्या अनिल गोटे, मनिषा चौधरी, मेधा कुलकर्णी यांच्यासह अनेक सदस्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणी करीता विधानसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

त्यातच अनिल गोटे यांनी धनंजय मुंडे यांची कृती ही देशद्रोह्याची असल्याचा आरोप करत परिचारक यांच्या वक्तव्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यावेळी आम्ही त्यांच्यावर पहिल्यांदा निलंबनाची कारवाई केल्याचे सांगत त्यानुसार धनंजय मुंडे यांच्यावरही पहिल्यांदा निलंबनाची कारवाई करावी आणि त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली.

गोटे यांच्या भाषणातील हाच धागा शिवसेनेचे गटनेते सुनिल प्रभू यांनी पकडत प्रशांत परिचारक यांचे वक्तव्य हे देशद्रोह्याचे होते. त्यामुळे परिचारक यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करणे चुकीचे असून ती कारवाई रद्द करून पुन्हा त्यांना निलंबित करावे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली. त्यामुळे भाजपला चांगलाच हादरा बसल्याने भाजपचे आमदार अँड. आशिष शेलार यांनी प्रभू यांना उद्देशून या गोष्टीची गरज नव्हती अशी विचारणा केली.

Exit mobile version