मतदार यादी पुनर्रिक्षण कामासाठी शिक्षकांच्या सेवा घेण्याबाबत निर्माण झालेल्या प्रश्नावर संबंधित विभागांची तातडीची बैठक घेऊन योग्य उपाययोजना करण्यात येतील. तसेच शिक्षकांच्या निवडणूक कामकाजाचा त्यांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानपरिषदेत दिले.
या संदर्भात नियम ९२ अन्वये अर्धा तास चर्चेदरम्यान सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. भोयर बोलत होते.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले, लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० आणि १९५१ मधील तरतुदींमुळे अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या निवडणूक कामकाजाबाबत कायदेशीर बाबी निर्माण झाल्या असून, यासंदर्भात न्यायालयीन निर्णयही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने निवडणूक अधिकाऱ्यांना सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पुढे बोलताना डॉ पंकज भोयर यांनी सांगितले की, या सूचनांनुसार, शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्त करताना त्यांच्या नियमित अध्यापनात अडथळा येणार नाही, याची काळजी घ्यावी. हे काम सुट्टीच्या दिवशी किंवा अशैक्षणिक वेळेतच देण्याचे निर्देश आहेत. काही जिल्ह्यांत शिक्षकांना पूर्णवेळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते दुरुस्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, असे सांगितले.
शेवटी बोलताना डॉ पंकज भोयर म्हणाले की, शिक्षक घडवित असलेली भावी पिढी लक्षात घेता हा विषय अत्यंत संवेदनशील असून, शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी मंत्र्यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
