विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानांतूनच पुस्तके, गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या राज्यातील काही खासगी तसेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाशी संलग्न शाळांवर शासन कठोर कारवाई करील, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.
राज्यातील शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याबाबत विधानपरिषद सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न उपस्थित केला. या चर्चेत सदस्य भाई जगताप, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारच्या सक्तीला शासनाचा ठाम विरोध असून यापूर्वीही काही शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक विभागीय उपसंचालक कार्यालयांतर्गत सहायक संचालकांच्या नियंत्रणाखाली नोडल अधिकारी नेमले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत शाळांमधील खरेदी प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवली जाईल आणि नियमभंग करणाऱ्या शाळांवर तात्काळ कारवाई केली जाईल.
शेवटी बोलताना डॉ पंकज भोयर म्हणाले की, लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर मांडलेल्या तक्रारींच्या आधारे संबंधित शाळांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या यादीच्या आधारे तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही नमूद केले.
