Marathi e-Batmya

केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य सचिव यांच्याकडे व्यक्त केली नाराजी

महाराष्‍ट्राच्या आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांचे शिष्टमंडळ महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहे. यावेळी केंद्रीय मुख्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही योग्यरितीने पार पाडली नसल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या शिष्टमंडळाने आज ट्रायडेंट हॉटेल येथे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा विविध अंमलबजावणी यंत्रणांकडून घेतला. यावेळी मुख्य सचिव, तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांकडून सविस्तर आढावा घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत चर्चा करून त्यांच्या सूचनाही आयोगाने घेतल्या.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांना काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी केली. तसेच रश्मी शुक्ला या राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि महायुतीच्या बाजूने सतत काम करत असल्याचे सांगत राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना या काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप करणे, त्यांच्या विरोधात खोटे षडयंत्र आखणे, प्रसंगी धमकावणे आदी गोष्टी केल्याची तक्रार करत पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरून हटविण्याची मागणीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली.

यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबर पर्यंत ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी ३ वर्षे पूर्ण होत आहे किंवा जे अधिकारी त्यांच्या मुळ गावी अर्थात गृहजिल्ह्यात पदावर आहेत अशांची बदली करण्याचे आदेश यापूर्वीच राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिले होते. त्या पत्रानुसार कारवाई झाली नसल्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, देशाचे गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक जिल्ह्यात बैठका घेतल्या. तसेच राज्यातील पुणे येथील मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सहाव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार होते. मात्र पावसामुळे त्यांचा दौरा जरी पुढे ढकलण्यात आलेला असला तरी येत्या रविवारी पंतप्रधान मेट्रो सह अनेक नव्या प्रकल्पांचा पायाभरणी शुमारंभ करणार आहेत. त्यानंतर अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानसभा निवडणूका जाहिर करणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.

Exit mobile version