Marathi e-Batmya

एकनाथ शिंदे यांची मागणी, चड्डी-बनियान गँगच्या असभ्य गोंधळाबाबत काँग्रेसने जनतेची माफी मागावी

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमधून जगापुढे भारताचे तंत्रवैभव सादर केले जात असताना भारत मंडपममध्ये युथ काँग्रेसच्या चड्डी-बनियान गँगने असभ्य गोंधळ घालून भारताची जागतिक स्तरावर नाचक्की केली. हे देशप्रेम नव्हे, हा एक प्रकारचा देशद्रोह आहे, अशी टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेसने आणि त्यांच्या नेत्यांनी देशातील जनतेची माफी मागायला हवी, अशी मागणीही यावेळी शिंदे यांनी केली.

‘एक्स’वरील पोस्टमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या या वृत्तीची तीव्र शब्दांत निंदा केली आहे. ते म्हणाले की भारत-अमेरिका कराराला विरोध असेल तर त्या विरोधाची कारणे सांगत सैद्धांतिक मांडणी काँग्रेसने केली पाहिजे. तसे न करता, भारत मंडपममध्ये गोंधळ घालून, देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून विदेशी पाहुण्यांसमोर आपल्याच देशाची प्रतिमा मलिन करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केला. परदेशात जाऊन भारताविषयी अपप्रचार करणारे राहुल गांधी यांच्यासारखे नेते असल्यानंतर त्यांच्या तरुण कार्यकर्त्यांकडून अपेक्षा तरी काय करणार असा टोलाही लगावला.

शिवसेनेचे काँग्रेस विरोधात आंदोलन

शिवसैनिकांनी शनिवारी दुपारी मुंबईतील बाळासाहेब भवन येथे काँग्रेस आणि राहुल गांधी विरोधात जोरदार आंदोलन केले. राहुल गांधी मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात माजी महापौर दत्ता दळवी, माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेना सचिव चित्रपट सेना अध्यक्ष सुशांत शेलार, माजी नगरसेवक राजू पेडणेकर, दिलीप नाईक, विभागप्रमुख गणेश सानप, निलम पवार यांच्यासह महिला आघाडी, युवती सेना आणि मोठ्या संख्येने शाखा प्रमुख शिवसैनिक सहभागी झाले होते. काँग्रेस देशद्रोही आहे अशी घणाघाती टीका शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी यांनी केली.

Exit mobile version