महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज पाच उमेदवारांनी आज विधानसभेत जावून उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारांनी अशा एकूण पाच उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख असून अर्ज माघारीची तारीख ३ जून आहे.
या उमेदवारामध्ये भाजपाकडून केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डॉ अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल, काँग्रेसकडून इम्रान प्रताप गढी या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरला.
तर मागील आठवड्यात शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत आणि महाविकास आघाडीचा चवथा उमेदवार म्हणून संजय पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे महाविकास आघाडीकडून चार तर भाजपाचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. गतवेळच्या आकडेवारीनुसार भाजपाचे दोन राज्यसभा निवृत झाले. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक राज्यसभा सदस्य निवृत्त झाला. मात्र यावेळी शिवसेनेकडे असलेली अतिरिक्त मते आणि एकूण महाविकास आघाडीची मते विचारात घेवून शिवसेनेकडून चवथा उमेदवार रिंगणात उतरविला आहे.
तर भाजपाकडून दोन उमेदवार विजयी होवून अतिरिक्त राहीलेल्या मतांच्या जोरावर तिसरा उमेदवार धनंजय महाडिक या रिंगणात उतरविले आहे. या निवडणूकीसाठी विजयासाठी ४२ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिक यांच्या थेट लढत होणार आहे. भाजपाकडे अपक्षांसह ११२ मते आहेत.
त्यामुळे ८४ मतांच्या जोरावर भाजपाचे दोन उमेदवार आरामात निवडून जातात. तर अतिरिक्त २८ मते भाजपाकडे शिल्लक रहात आहेत. त्यामुळे धनंजय महाडिक यांना विजयी होण्यासाठी आणखी १४ मतांची जमावाजमव करावी लागणार आहे.
तर महाविकास आघाडीकडे अपक्षांसह १६७ मतांचे संख्याबळ आहे. जर महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फाटाफुट झाली नाही तर महाविकास आघाडीचे संजय राऊत, संजय पवार, प्रफुल पटेल आणि इम्रान प्रतापगढी यांचा सहज विजय शक्य आहे. आणि जर घोडेबाजार झाला तर मात्र शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होईल.
