Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, २००२ च्या गुजरात दंगलीप्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र

भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे. पाच राज्यातील निवडणुकांच्या निकालापासूनच धार्मिक तेढ निर्माण करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. २००२ मध्ये गुजरातमध्ये जशा दंगली घडवून आणल्या होत्या, त्याच पद्धतीने देशभर दंगली करुन २०२९ च्या निवडणुका जिंकायच्या हे षडयंत्र आधीपासूनच रचले असून विधानसभा निवडणुकीनंतर सुरु झालेल्या दंगली या त्याचे पहिले पाऊल आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल, आसामसह पाच राज्यातील निवडणुकीत हिंदू मुस्लीम द्वेष वाढवणारा अजेंडा चालवला, त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही कारण जनगणनेनंतर जानेवारी २०२८ मध्ये डिलिमिटेशनची प्रक्रिया सुरु होणार आहे. डिलिमिटेशनसाठी सुप्रीम कोर्टातील कोणत्या निवृत्त न्यायाधिशाला डिलिमिटेशन कमिटीत घ्यायचे हे सुनिश्चित झालेले आहे. डिलिमिटेशन नंतरचा मतदार संघाचा नकाशाही तयार झालेला आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

तामिळनाडूतील राजकीय घडामोडींवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, तामिळनाडूत निवडणुकीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीत जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय हा स्थानिक नेते, प्रभारी यांनी सर्वांशी विचारविनिमय करुनच पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे. टीव्हीके पक्षाबरोबर निवडणुकीपूर्वीच आघाडी करावी अशी स्थानिक नेते व कार्यकर्त्यांची मागणी होती, त्यावेळीच तसा निर्णय घेतला असता तर काँग्रेस पक्षाचे जास्त आमदारही निवडून आले असते पण लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लढा देणाऱ्या पक्षाबरोबर आघाडी करण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असेही सांगितले.

मुंबई महानगरपालिकेने संडास बांधण्यात भ्रष्टाचार केल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, भ्रष्टाचारासाठी भाजपाला संडासची जागाही कमी पडत आहे. याआधी सुलभ शौचालयात भाजपाने भ्रष्टाचार केला होता. मोहित कंभोज यांना मलिदा आणि कार्यकर्त्यांना मात्र संडासची जागा, असा टोलाही सपकाळ यांनी लगावला.

Exit mobile version