Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, ओबीसी विचार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवा

ओबीसी विचार महाराष्ट्राने देशाला दिला आहे. शिव, शाहु, फुले, आंबेडकर विचार व वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान हे ओबीसी चळवळीचे दोन स्रोत आहेत आणि या विचाराचा माणूस जातीच्या पलीकडे पहात असतो. महाराष्ट्राचा हा विचार देशभर पोहचवण्याची आज नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन मध्ये महात्मा फुले व्दिशताब्दी जयंती निमित्त ‘सत्यशोधक चळवळ’ परिसंवाद व प्रज्ञावंतांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ओबीसी विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश उपाध्यक्ष किशोर कन्हेरे, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अनंत मोहोड, पनवेल जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, काँग्रेस हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे म्हणूनच सर्व समाज घटकांना स्थान देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ओबीसीच्या लढ्याचा एल्गार पुकारलेला आहे. जिसकी जितनी आबादी, उतनी भागिदारी, या सुत्राने पक्ष व संघटनेत विविध समाज घटकांना स्थान दिले जात आहे. राहुल गांधी यांनी सुरु केलेला एल्गार देशभर पोहचला पाहिजे त्यासाठी सर्वांनी त्यांचे हात बळकट केले पाहिजेत, त्यांच्या मागे एक शक्ती उभी केली पाहिजे व राहुल गांधी यांनी जे स्वप्न पाहिले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाची आहे, असेही यावेळी सांगितले.

ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी यावेळी म्हणाले की, महात्मा फुले यांची द्विशताब्दी जयंती राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरी करण्याचा निर्णय घेतलेला असून या अतंर्गत महात्मा फुलेंचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचवण्याचा संकल्प केला आहे. महात्मा फुले द्विशताब्दी जयंती कार्यक्रमाची सांगता सभा सातारा जिल्ह्यात घेतली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह ओबीसी समाजाच्या नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

Exit mobile version