Marathi e-Batmya

देवेंद्र फडणवीसांचे आरोपानंतर माजी गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, असा आदेशच नव्हता

२०१९ साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात स्थानापन्न झाले. मात्र या सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिंता निर्माण झाली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत फडणवीसांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.

एका खाजगी दूरचित्रवाणीच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उद्धव ठाकरेंनी बंद केले. पाच वर्षे आम्ही सत्तेत होतो तरीही ते असं वागले. एवढंच नाही तर मी तुम्हाला हे सांगतो की मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही. मात्र अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच त्यावेळी मुंबई पोलिस आयुक्त असलेले संजय पांडे यांना दिलं होतं, असा गंभीर आरोप केला.

फडणवीसांनी केलेले आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावत म्हणाले, देवेंद्र फडणवीस नेमकं काय बोलले हे मी ऐकलेलं नाही. मात्र, त्यांनी जो आरोप केला आहे, तसा कोणताही प्रयत्न महाविकास आघाडीच्या काळात झाला नाही. फडणवीस हे त्यांना असलेल्या माहितीच्या आधारे बोलले असतील. मात्र, मला जी माहिती आहे, त्यानुसार तेव्हाच्या राज्य सरकारने असे कोणतेही आदेश देण्यास आले नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.

Exit mobile version