Marathi e-Batmya

निवृत्ती वेतनच्या नावाखाली भाजपाचा जुमला की सरकारच्या तिजोरीत पैशेच नाहीत

महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली (NPS) अंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ६ मे २०२६ रोजी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन परिपत्रक जारी केले. मात्र, या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची सविस्तर कार्यपद्धती अद्याप निश्चित झालेली नसल्याने मे २०२६ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळालेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

शासनाने २० सप्टेंबर २०२४ रोजी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ६ मे २०२६ रोजी योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार पात्र कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या ५० टक्के निवृत्ती वेतन व त्यावर महागाई वाढ देण्याची तरतूद आहे. तसेच कुटुंब निवृत्तिवेतनाचीही तरतूद करण्यात आली आहे.

मात्र, शासन परिपत्रकातील मुद्दा क्रमांक १२ नुसार निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करण्याची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. हीच कार्यपद्धती अद्याप निश्चित न झाल्याने प्रत्यक्ष पेन्शन वितरण रखडल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शासनाने या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली असून, समितीने यापूर्वी चार महिन्यांचा कालावधी घेतला आहे. त्यानंतर आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ घेण्यात आल्याची माहिती कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे आता १० जानेवारी २०२७ पर्यंत या प्रक्रियेची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

पेन्शन मिळेपर्यंत प्रोव्हिजनल पेन्शन द्या!

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, शासनाने पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला असताना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास विलंब का होत आहे? आयुष्यभर शासनाची सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या हक्काच्या निवृत्तिवेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे घरखर्च, औषधोपचार, कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या आणि दैनंदिन गरजा पेन्शनवर अवलंबून आहेत.

त्यामुळे शासनाने सुधारित पेन्शन योजनेची अंमलबजावणी आणि पेन्शन वितरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. समितीच्या अहवालासाठी किंवा प्रशासकीय कार्यपद्धती निश्चित होण्यासाठी आणखी वेळ लागणार असल्यास, तोपर्यंत पात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियमानुसार प्रोव्हिजनल (तात्पुरते) पेन्शन सुरू करावे, अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

शासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज

सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळणे ही केवळ प्रशासकीय बाब नसून त्यांच्या सन्मानाने जगण्याशी संबंधित बाब आहे. त्यामुळे समितीचा अहवाल, प्रशासकीय प्रक्रिया आणि अंतिम निर्णय यांची प्रतीक्षा करताना कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीत ठेवू नये. शासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून पात्र कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरू करावे अथवा अंतिम निर्णय होईपर्यंत प्रोव्हिजनल पेन्शन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

आता शासन या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन किती लवकर निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासन निर्णय खालीलप्रमाणे

Exit mobile version