शेतकऱ्यांवर, सर्वसामान्य लोकांवर मोठे संकट ओढवले आहे. त्यांच्यासाठी सरकारकडे वेळ नाही पण बाकीचे उद्योग करण्यासाठी सरकारला भरपूर वेळ आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रपरिषदेत विरोधी पक्षांनी सरकारच्या वतीने निमंत्रित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, सरकारने वेळोवेळी केलेले असहकार्य पाहता, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार घातला आहे. जून महिना संपत आला आहे, पण अजूनही पावसाचा पत्ता नाही. खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली, पण पाऊस न आल्यामुळे बियाणे वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे नाशिक, जळगाव, धुळे, सोलापूर, पुणे, सांगली, सातारासह अनेक भागांतील केळी, द्राक्ष, पेरू, डाळिंब या फळबागांना देखील नुकसान झाला आहे. पण सरकारने काही मदत जाहीर नाही केली आहे. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. २५०० रु/क्विंटल दर अपेक्षित होता पण सरकारला ते देखील करण्यात अपयश आले आहे अशी टीका केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणांमध्ये सध्या केवळ २३ ते २५ टक्केच पाणीसाठा उरलेला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा जवळपास ३१ टक्के होता. एल निनोची चर्चा जगभरात सुरू होती. तरी पाण्याचे नियोजन केले नाही. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आहेत. कंत्राटदारांची अनेक बिले प्रलंबित आहेत. जलजीवन मिशन योजनेत केंद्राने बजेट कपात केले आहे. कोल्हापूरच्या अधिवेशनात कंत्राटदाराने जाहीरपणे सांगितले की, ५६% पैसे वाटावे लागतात. त्यामुळेच कामाचा दर्जा सुमार आहे असेही ते म्हणाले त्यासाठी त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पाणीगळतीचे उदाहरण दिले.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शक्तीपीठ महामार्गाचा निषेध करताना ते म्हणाले की, रस्त्याची मागणी नसताना रस्ता करत आहेत. मागणी आहे तिथे खर्च करत नाहीत. महिलांवर अत्याचार वाढले आहे, ड्रग्सचे प्रमाण राज्यात प्रचंड वाढले आहे. सगळ्या जिल्ह्यांना ड्रॅग्सचा विळखा बसला आहे. या प्रकरणात किरकोळ लोकांना अटक झाली. मास्ट्रर माईंड मोकाट आहेत. अंमली पदार्थ विकणारे आणि पोलिसांचे नेक्सस स्ट्राँग आहे आरोपही केला.
शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, विकासाच्या नावाखाली राज्यभर जंगल तोड केली जात आहे. शासनाने हिंदूंच्या भावनांची देखील कदर केली नाही. प्रभू श्री राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवनात देखील जंगल तोड केली. अनेक ठिकाणी झालेले देवस्थान जमिन घोटाळे मागील अधिवेशनात मांडले. पण अद्याप काही कारवाई झालेली नाही. आम्ही मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सरकारने उत्तर देणे अपेक्षित आहे असे मत मांडत असतानाच विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधी पक्षनेता नाही हे चिंताजनक आहे. विरोधी पक्षनेता नेमण्याचे औदार्य सरकारने दाखवावे. जेणेकरून या सर्व प्रश्नांना अधिक प्रभावीपणे मांडता येतील अशी मागणी केली.
