पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिंडीत सहभागी होत सरकारवर जोरदार हल्ला केला.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, सगळी देवस्थाने जोडणारा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असं सरकार म्हणतं मात्र सर्वात मोठे देवस्थान असलेल्या पंढरपूरपासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर आहे. यापूर्वी विविध माध्यमातून शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली, विधिमंडळात आवाज उठवला, सरकारचा निषेध केला. त्यावर सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अनेक ठिकाणी जमीन मोजणीसाठी नोटीसा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी मोजणी झाल्यानंतर पुढील प्रश्न आणखी वाढतील असा इशारा सरकारला दिला.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आम्ही विकासाच्या आड येणार नाही. सरकारचा विकास म्हणजे नक्की काय? दोन मजल्यावरून रस्ता जाणार, यावरून माल वाहतूक होणार हा विकास आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत असतानाच शेतकऱ्यांचा यात काय फायदा? असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांची जमीन जाणार, जमीन दुभागणार यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे. आम्ही बोगदे काढू असे सरकार म्हणत आहे. म्हणजे या महामार्गाचा खर्च अधिक वाढणार. आमच्या भागातील अरण गावाची एकूण १२०० एकर जमीन असेल, त्यातील ६०० एकर जमीन जाणार. कामेरी गावाची २८६ एकर जमीन जाणार आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकांना काय करायचे ते करू द्या, कसं निवडून यायचं ते आम्हाला माहिती आहे असा अति आत्मविश्वास सरकारला आहे अशी टीकाही केली.
जयंत पाटील म्हणाले की, जमिनीचा दर वाढवला तर लोकं आपल्या बरोबर येतील, गप्प बसतील असा समृद्धी महामार्ग बांधताना आलेला अनुभव येथे टिकणार नाही असा दम त्यांनी सरकारला भरला तसेच पेपर लीक प्रकरणी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना २० व्या दिवशी उचलून नेले. अभिजीत दिपके यांच्या आंदोलनात दडपशाही करणे हे हुकुमशहाचे लक्षण आहे. यापूर्वी शेतकऱ्यांचे आंदोलन देखील असेच दडपण्यात आले. त्यामुळे अधिक संघटितपणे आपल्याला लढा द्यायचा आहे असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
