विधानसभेचे कामकाज सुरु असताना संध्याकाळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या ९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांवर आक्षेप घेतला. तसेच जी चुक नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करताना केली नाही ती चूक १० व्यांदा का करताय असा थेट सवाल जयंत पाटील यांनी अजित पवार यांनी मांडलेल्या पुरवणी मागण्यांबाबत उपस्थित केला.
त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या आक्षेपावर उत्तर देताना म्हणाले की, जसे केंद्रातील अर्थसंकल्पातील चुका आणि त्याचे अभ्यासक जसे असतात तसे जयंत पाटील हे एक राज्याच्या अर्थसंकल्पाचे अभ्यासक असल्याचे सांगत जयंत पाटील यांचे नाव घेत थेट हातच जोडले.
यावेळी जयंत पाटील बोलताना म्हणाले की, अर्थमंत्री अजित पवार यांनी यापूर्वी २० हजार कोटी महसूली तूटीचा अर्थसंकल्प सादर केला. तर अंदाजित तूट एक लाख कोटी रूपयांची अर्थसंकल्प सादर करताना दाखवली. तसेच आज पुन्हा ९४ हजार कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. जर हे ९४ हजार कोटी रूपये खर्च केले तर राज्याच्या महसूली तूटीत वाढ होणार आहे. तसेच जीडीएसपीचा विचार केला तर जवळपास १ लाख २० हजार कोटी रूपयांची तूट निर्माण होईल. यामुळे केंद्र सरकारने निर्धारीत केलेल्या ३.५० टक्क्यापेक्षा हा खर्च जास्त होईल, राज्याचे रेटींग कमी होईल आणि आपल्या राज्याला जास्तीच्या व्याजदराने नव्याने कर्ज काढावे लागेल. जी गोष्टी मागील ९ अर्थसंकल्पावेळी केली नाही. ती आता १० व्यांदा अर्थसंकल्पावेळी का करताय असा खोचक सवाल करत कदाचित अजित पवारांवर ही चूक (सत्ताधाऱ्यांकडे बोट करत) तुमच्यामुळे ही चूक करण्याची वेळ कदाचित त्यांच्यावर आली असावी अशी आठवणही यावेळी करून दिली.
तसेच जयंत पाटील म्हणाले की, निवडणूकांमध्ये जिंकून येण्यासाठी राज्याचे नाव खराब कशाला करता असा खडा सवाल करत केवळ बाकीच्यांमुळे तुम्ही असे करू नये असे आवाहन करत तुम्ही ९४ हजार कोटींच्या मागण्या सादर करू नये असेही सांगितले.
जयंत पाटील यांच्या या आक्षेपावर अजित पवार म्हणाले की, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर जसे तज्ञ आपले मत व्यक्त करतात. तसे राज्याच्या अर्थसंकल्पाचे अभ्यासक हे जयंत पाटील हे आहेत असे सांगत हात जोडले.
पुढे अजित पवार म्हणाले की, जयंत पाटील यांनी अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि विरोधी पक्षांनी याबाबत चर्चा करावी अशी विनंती करत अर्थसंकल्प सादर करताना काही महत्वाच्या गोष्टींसाठी आपण निधी देतो, तर काही गोष्टींसाठी नंतर निधी आपण देतो. त्यामुळे आतापर्यंत जी काही ओळख आहे. ती टीकवून ठेवणे गरजेचे आहे. तसेच जयंत पाटील हे अर्थतज्ञ आहेत. त्यांच्या सल्ल्याची आपण दखल घेणे गरजेचे असल्याचे भूमिकाही यावेळी व्यक्त केली.
