Marathi e-Batmya

जयंत पाटील यांचा इशारा, रामटेक मंदिर ट्रस्टमध्ये इतका भ्रष्टाचार होईल की अयोध्येचे मंदिरही मागे पडेल

‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ आज विधानसभेत मांडण्यात आले. राजकारणी लोकांना ट्रस्टवर घेऊ नका, इतका भ्रष्टाचार होईल की अयोध्येचे मंदिर मागे पडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी दिला.

या विधेयकावर मत मांडताना जयंत पाटील असे म्हणाले की, भोसले कुटुंबाचा रामटेक मंदिराशी जुना संबंध आहे. या कुटुंबातील एकच व्यक्ती विश्वस्तांमध्ये का? किमान दोन सदस्य तरी घ्यावेत. राजकीय लोक ट्रस्टवर घेऊन आपण मंदिराचे राजकीयकरण करतो आहोत. अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणी आमदार, खासदार ट्रस्टवर घेतलेले नाहीत. तुम्ही त्यांचे पालन करता आहात, तर त्यातून काहीतरी बोध घ्या असे ते म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ट्रस्टच्या सदस्यांना दैनिक, वाहतूक भत्ता देण्याची जी सोय केली आहे, ती काढावी. देव मंदिरात असताना यांनी बाहेर दौरे का करावे? तसेच सदस्यांनी रामटेक येथील श्री राम यांचे भक्त असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यायचे त्यानंतर ट्रस्टमध्ये प्रवेश मिळणार असा यात मुद्दा आहे. ही अनिष्ट प्रथा भक्तांवर आणत आहात. एखादा व्यक्ती जर हनुमानाला पण मानत असेल तर दुहेरी निष्ठेचा गंभीर प्रश्न तयार होईल. सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या घटनेच्या विरोधी हे विधेयक आहे असे मत व्यक्त केले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येला जशी चोरी झाली तशी इथे होऊ नये याचा अभ्यास करून, योग्य प्रोव्हिजन करून पुढच्या अधिवेशनात हे विधेयक आणा असा सल्ला देत असतानाच दानपेटीच्या समोर, दानपेटी उघडताना सीसीटीव्ही असला पाहिजे. दान मोजणीच्या पद्धतीचा देखील काही उल्लेख या बिलात नाही अशा त्रुटी त्यांनी काढल्या. देवासाठी मिळालेले जे काही दान आहे, त्याची त्याच दिवशी रजिस्टर मध्ये नोंद झाली पाहिजे. हे महत्वाचे बिल आहे. अयोध्येच्या चोरीचा SIT रिपोर्ट आल्यावर, सविस्तर अभ्यास करून हे बिल आणावे. राम मंदिर क्षेत्राबाहेर आमदार आणि नगराध्यक्षांना मंदिर ट्रस्टचे पैसे वापरता येणार नाहीत, ही तरतूद करा. देशात रामराज्य आणण्याच्या कल्पनेतील आपला राम आहे. त्यामुळे हे बिल जॉइंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवावं आणि पूर्ण विचारांती हे बिल पुन्हा मांडावं अशी मागणी केली.

जयंत पाटील यांनी विधानसभेत सादर केलेली हीच ती कविता-

जयंतराव पाटील यांनी सामना चित्रपटात मारूती कांबळेचं काय झालं ? हा खुप प्रसिद्ध संवाद आहे. त्यावर संवादावर आधारित कविता बोलून आपले भाषण संपवले…
सरकार म्हणालं जनतेला…
आता सगळं फिक्स झालं, महाराष्ट्राला एक मिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे डन झालं..
जनता म्हणाली सरकारला..
साहेब, पेट्रोल १११ झालं,
डिझेल शंभरी जवळ आलं,           सांगा महागाई कमी करण्याचं काय झालं ?
सरकार म्हणालं जनतेला…
डावोसला जाऊन करार झाला, महाराष्ट्रात मोठा उद्योग आला.. मोठं काम झालं..
पालक म्हणाले सरकारला…
मग आमचं पोर बेरोजगार का झालं ?
सांगा, २ कोटी रोजगाराचं काय झालं ?
सरकार म्हणालं महिलांना..
महिलांचा आता प्रश्न नाही, त्यांनाही मिळालं बरंच काही, त्यांचं मतही आपलं झालं..
महिला म्हणाल्या सरकारला..
साहेब, ८० लाख महिलांना बाद का केलं ?
लाडकी बहिण योजनेचं काय झालं ?
आता सरकार वैतागलं… विद्यार्थ्यांकडे वळलं..
सरकार म्हणालं विद्यार्थ्यांना..
तुमच्यासाठी खुप केलं, ‘नीट’ केलं
विद्यार्थी म्हणाले सरकारला..
तेच आम्ही विचारतोय…
नीटचं काय झालं, सीईटी-टीईटीचं काय झालं ?
आता सरकारने मात्र प्रभू रामाकडे धावा केला… रामा… वाचव रे आम्हाला… आता तुझं मंदिरही झालं…
राम म्हणाले सरकारला…
आधी सांगा माझ्या भक्तांनी दिलेल्या दानाचं काय झालं ?
Exit mobile version