Marathi e-Batmya

जयंत पाटील यांची मागणी, इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्या

कांद्याचे घसरते दर आणि शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केली.

आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, सध्या देशभरातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे. बांग्लादेशने कांद्याची आयात बंद केल्याने शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील नाशिक, नगर आणि अन्य भागात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. आज परिस्थिती अशी आहे की, कांद्याची साठवणूक केली तर कांदा सडतो. म्हणून शेतकऱ्यांना कमी भावात कांदा विकावा लागत आहे. दिवसेंदिवस कांद्याची किंमत घसरत चालली आहे अशी माहिती त्यांनी दिली.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, कांद्याची लागवड करताना शेतकऱ्यांना बरीच आव्हाने पार करावी लागतात. पीक आल्यानंतरही त्याची मोठ्या प्रमाणात जपणूक करावी लागते. त्यामुळे कांदा उत्पादकांना हे नुकसान सहन करण्यापलीकडे आहे. सरकारने या गोष्टींची गांभीर्याने दखल घेत इतर पिकांप्रमाणे कांद्यालाही हमीभाव ठरवून द्यायला हवा अशी मागणी केली.

Exit mobile version