Marathi e-Batmya

जयंत पाटील यांची मागणी, कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करा आणि नुकसान भरपाई द्या

कांद्याला किमान २००० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली.

आपल्या पत्रात जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य कांदा उत्पादक राज्य असून नाशिक, पुणे, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या जिल्ह्यांतील लाखो शेतकऱ्यांचे जीवन पूर्णपणे या पिकावर अवलंबून आहे. मात्र, गेल्या काही काळापासून कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण आणि बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे हा शेतकरी आज अत्यंत गंभीर संकटात सापडला आहे. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीच्या खर्चात झालेली मोठी वाढ पाहता, सध्या बाजारपेठेत मिळणारा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना या आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने तातडीने काही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये दर कोसळल्याने नाफेड आणि इतर संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना आधार मिळणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.

शेवटी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कांदा निर्यातीबाबतच्या अस्थिर धोरणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची पत कमी होत आहे, तरी केंद्र सरकारशी समन्वय साधून एक दीर्घकालीन आणि स्थिर निर्यात धोरण राबवण्यात यावे. शेतकऱ्यांच्या थेट मदतीसाठी ५०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान आणि रासायनिक खतांवरील अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT) जमा करणे काळाची गरज आहे. यासोबतच, भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागात आधुनिक शीतगृहे आणि ‘कांदा चाळ’ उभारणीसाठी भरघोस अनुदान देण्यात यावे आणि दर्जेदार कांदा बियाणे सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली.

Exit mobile version