पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुणे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. ‘अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची’ या जाहीरनाम्यात मुख्य आठसूत्री कार्यक्रमाबरोबरच पुण्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देण्यात आली आहे. याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, सुभाष जगताप, श्रीकांत पाटील, विशाल तांबे, राजलक्ष्मीताई भोसले, प्रकाश म्हस्के, स्वाती पोकळे, विजय कोलते, दीपक मानकर, मनाली भिलारे यांच्यासह आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
या जाहीरनाम्यात शहरातील सर्व भागात नळाद्वारे दररोज पाणी, ट्राफिक आणि खड्डेमुक्त पुणे, नव्याने समाविष्ट गावात शहर मानकांनुसार रस्त्याची निर्मिती, शहराची नियमित स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन, आधुनिक दर्जाच्या आरोग्य सुविधा परवडणाऱ्या किफायतशीर दरात, पर्यावरण संवर्धनासह प्रदूषणमुक्त पुणे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास, उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी पुणे मॉडेल स्कूलची निर्मिती आणि डिजिटल शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट्स, आणि सर्व आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे उत्तरदायित्व देखील आघाडीने स्वीकारले आहे. यामुळे मागील काळात थांबलेला पुण्याचा विकास पुन्हा सुरू करण्यासाठी पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ देतील हा विश्वास आहे.
पुण्यातील पाणी प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, टँकर माफियाचा उल्लेख करत सांगितले की, हा अनुभव त्यांनाही आहे. मी ज्या भागात राहते तिथेसुद्धा पाण्याची अडचण आहे. शहरात राहूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो, यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मेट्रोबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मेट्रोचा शेवटचा कनेक्टिव्हिटी टप्पा पूर्ण झाल्यावरच त्याचा खरा उपयोग कळतो. प्रत्येक मेट्रो स्थानक पूर्ण क्षमतेने सुरू झाले पाहिजे. वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत त्यांनी सांगितले की, पुढील दोन ते तीन वर्षांत वाहतूक समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाय करून दाखवू असे सांगितले.
सुप्रिया सुळे शेवटी बोलताना म्हणाल्या की, शहराचा वाढता खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल. सोलर प्रकल्पांमुळे विजेचा खर्च कमी करता येतो आणि पर्यावरणालाही फायदा होतो असे त्यांनी नमूद केले. पुणे स्वच्छ, सुंदर आणि गुन्हेगारीमुक्त व्हावे ही आमची भूमिका आहे. यातील अनेक कामे आम्ही यापूर्वी करून दाखवली आहेत, तर अनेक ठिकाणी कामे आधीच सुरू आहेत, असे त्या म्हणाल्या. हे सगळे शक्य आहे, फक्त त्यासाठी इच्छाशक्ती लागते आणि ती आमच्यात आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी पुणेकरांना आवाहन करत , घड्याळ-तुतारी बटण दाबा, आम्ही जे सांगतो ते करून दाखवतो असे आवाहनही यावेळी केले.
अजित पवार यांनी जाहिर केला जाहिरनामा
आज पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले.
यावेळी अजित पवार यांनी संबोधित करताना, पुणे शहरात गेल्या १० वर्षापासून समस्यांचा अलार्म वाजतोय. हा जाहीरनामा म्हणजे ठोस वचनांनी त्या अलार्मला दिलेले उत्तर आहे. गेल्या सहा महिन्यात वॉर्डनिहाय सर्वेक्षण करुन, पुणेकर रोज भोगत असलेल्या नागरी समस्यांचा विचार यात केला असल्याचे स्पष्ट केले.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, पुणे शहारासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात पहिले काम म्हणजे, पुण्यासारख्या शहरात वेळेवर पाणी मिळत नाही, यापेक्षा दु:खद काही नाही. म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये पुरेशा दाबासह दररोज नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार. पाणीपुरवठ्याच्या ठराविक वेळा आधीच जाहीर केल्या जातील आणि काटेकोरपणे पाळल्या जातील. टॅंकर पाण्यावरचे अवलंबित्व संपविले जाईल.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, दुसरे काम, विकास आराखड्यातील रस्ते आणि मिसिंग लिंक ठराविक कालावधीत पूर्ण केले जातील. तसेच, नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील रस्ते अर्धवट न ठेवता पूर्ण शहरमानकांनुसार विकसित केले जातील. प्रत्येक खड्ड्यासाठी दुरुस्तीची कालमर्य़ादा असेल. खर्च कंत्राटदारालाच उचलावा लागेल आणि वारंवार दुर्लक्ष केल्यास दंड व काळ्या यादीत टाकले जाईल. रस्ते टिकाऊपणासाठी बांधले जातील. तिसरे काम म्हणजे स्वच्छता. स्वच्छतेकडे एखाद्या मोहिमेप्रमाणे नव्हे तर दररोज चालणाऱ्या व्यवस्थेप्रमाणे पाहिले जाणार आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, चौथे काम म्हणजे हायटेक आरोग्यसेवा. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित महापालिका रुग्णालये, नवीन रुग्णालये आणि बेडची लक्षणीय वाढ केली जाईल. परवडणाऱ्या तपासण्या, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, आयसीयू सुविधा, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य अधिक मजबूत केले जाईल.
अजित पवार म्हणाले की, पाचवे काम, पर्यावरण आणि प्रदूषणाच्या प्रश्नावर ठोस उपाय केले जातील. ड्रेनेज, ओढे, नाले आणि हरित क्षेत्रांचे संरक्षण व पुनरुज्जीवन केले जाईल. त्यावर अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. पूर, पाणी साचणे व प्रदूषण यावर तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन तोडगा काढला जाईल असेही यावेळी सांगितले.
अजित पवार शेवटी म्हणाले की, ही पाच वचने नाहीत तर ठाम नागरी हमी आहेत. या गोष्टी आम्ही करणारच हा माझा वादा आहे. याव्यतिरिक्त शिक्षण, कला क्षेत्रात अनेक कामे करणार आहोत. तसेच विकास पर्यावरणाशी समतोल राखून होईल; पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय. मोफत PMPML व मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी मालमत्ता कर सवलत, मोफत टॅब्लेट्स; “लाडकी बहीण” लाभार्थींना ५ लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज. शिक्षणाला प्राधान्य देऊन १५० “पुणे मॉडेल स्कूल”, डिजिटल शिक्षणासाठी मोफत टॅब्लेट्स यांसारख्या वरकरणी अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करण्यासाठी ठोस नियोजन आहे. ही सर्व कामे करण्यासाठी पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला साथ देण्याचे आवाहन यावेळी केले.
या पत्रकार परिषद प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प) राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. मा. सौ. सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
