मराठा आरक्षणप्रश्नावरून आता मराठा विरूध्द ओबीसी असा वाद निर्माण झाला असून मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या तयार करण्यात आलेल्या सगे-सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी १३ जुलै पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. तसेच आजपासून राज्यात मराठा समाजाकडून शांतता रॅलीचे आयोजन मनोज जरांगे पाटील यांनी करत साश्रु नयनांनी मराठा समाजाला आर्त साद घालत सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलं आहे, पण मी मराठा समाजाला विनंती करतो की, मला उघड पडायचं नाही. त्यामुळे तुमची साथ मला हवी आहे अशी आर्त हाक दिली.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी उघड्यावर पडलो तरी एकटा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागे हटणार नाही. मराठा समाजाला मी मायबाप मानलं आहे. माझ्यासाठी सर्वकाही मराठा समाजच आहे. माझ्या समाजाने मला कधीच कमी पडू दिलं नाही. मराठा समाजानेही मला दुःख द्यायला नाही पाहिजे असे सांगत माझी हात जोडून विनंती आहे की, मायबाप हो मी समाजासाठी लढतोय, माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही पाठीशी रहा असे आवाहनही यावेळी केले.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी समाजाला मोठं करायला निघालो आहे. माझ्या समाजाने खुप वेदना भोगल्या आहेत. समाजाचे विद्यार्थी शिकून मोठं व्हावेत, असं स्वप्न बघितलं पण आरक्षणाच्या अडचणीमुळे समाजातील तरूण मोठे होत नाहीत. आता सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय मला उघडं पडू देवू नका असे भावूक उद्गारही यावेळी काढले.
शेवटी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मनोज जरांगे जर लांब गेला तर समाजाला दुसरा निष्ठावान कोणीही मिळू शकणार नाही. त्यामुळे मला बदनाम करायचं ठरलं आहे. पण तुम्ही मला उघडं पडू देऊ नका, मला तुमची साथ हवी पाठबळ हवेय आणि आर्शिवादाची गरज असल्याचे भावनिक उद्गारही यावेळी काढले.
