Marathi e-Batmya

मनोज जरांगे पाटील यांची मागणी, हेक्टरी ७० हजार आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्या

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्यानंतर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी बीडमधील नारायण गडावर पहिलाच दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. तसेच या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शेतकऱ्यासाठी लढाही पुकारला आहे.

मनोज जरांगे पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, काही जण आम्हाला म्हणाले की, गुलामीचं गॅझेट घेऊन ओबीसी आरक्षण घेतलं. पण मी म्हणतो, तुम्हीही ब्रिटीशांनी १९१३ ला जी जणगणना झाली त्या आधारेच तुम्हाला आरक्षण मिळाले, की ब्रिटीश तुमच्या घरात रहायला होते म्हणून तुमची ओबीसी म्हणून नोंदणी झाली असा उपरोधिक टोलाही पंकजा मुडे यांचे थेट नाव न घेता लगावला.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, अरे मराठ्यांनो जरा अभिमान आणि स्व बाळगायला लागारे असे सांगत तुम्ही मराठे अशा व्यक्तींच्याकडे कधीही रोजगाराला जाऊ नका, जे आपल्याला गुलामीच्या गॅझेट मधले ओबीसी म्हणतात. अशा नेत्याच्या मागेही उभे राहु नका, जरा स्वतःचा अभिमान बाळगा असे सांगत उगाच कोणाच्या मागे फिरू नका असे आवाहनही यावेळी केले.

ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपण सगळ्या ओबीसींना बोलावत नाही का आपण बोलावतो, पण ओबीसी जातीतील काही नेते आपल्या विरोधात बोलतात, त्यामुळे आपण त्या जातीला आणि नेत्याला आपण टार्गेट करतो, पण यापुढे आपण एक लक्षात ठेवले पाहिजे, की जो ओबीसी नेता आपल्या विरोधात बोलेल त्यावेळी तो नेता आणि त्या जातीतील फायदे लाटणारे काही लोक यांनाच फायदा होतो. फक्त ते वगळून बाकी त्या जातीच्या लोकांना लांब करण्याचे काही कारण नाही असे ही सांगितले.

तसेच पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, तो छगन भुजबळही आपल्या विरोधात लयच बोलतो पण तो आणि त्याच्या जातीचा फायदा घेणारे फुलमाळी सोडले तर कोणीच आपले विरोधक नाहीत. त्यामुळे बाकीचे जे कोणी असतील ते आपलेच आहेत. जोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील सगळ्यांना एकदा का ओबीसी प्रमाण पत्र मिळाले की, त्यांना बघू असे सांगत आता प्रशासनात आपली मराठ्यांची मुलं दिसली पाहिजेत असे आवाहनही यावेळी केले.

मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, देशातील पहिला दसऱा मेळावा असेल त्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा पुकारला आहे. या अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्ववभूमीवर दिवाळी पर्यंत हेक्टरी ७० हजार रूपये रोखीने शेतकऱ्यांच्या हाती ठेवावेत आणि शेतीला नोकरीचा दर्जा द्यावा, ज्या प्रमाणे नोकरी करणाऱ्यांना त्यांचा महिन्याचा पगार दिला जातो, त्या प्रमाणे शेतकऱ्याला दर महिन्याला १० हजार रूपये पगार द्या अशी मागणीही केली. तसेच जी बेरोजगार मुले आहेत त्यामुळे त्यांना शेतात काम करायची आवड निर्माण होईल असेही सांगत कोणाला १० हजाराची शेतातील नोकरी पाहिजे असा सवाल करताच उपस्थित जनसमुदायातील अनेक जणांनी हात वर केले. त्यामुळे शेती कोणीही विकू नका असे आवाहनही यावेळी केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, त्याचबरोबर राज्य सरकारने दिवाळीपर्यंत ओला दुष्काळ जाहिर करावा असे आवाहन करत जर सरकारने दिवाळी पर्यंत मराठ्यांना आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केले नाही तर जिल्हा परिषद निवडणूकीत सरकारची एकही जागा शेतकऱ्यांनी निवडून द्यायची नाही. तसेच या मागण्या पूर्ण केल्या नाहित तर स्थानिक संस्थांच्या निवडणूकीत मतदान प्रक्रिया होवू देणार नाही असा इशाराही यावेळी दिला. तसेच यावेळी शेतकरी लढ्यासाठी सात कलमी कार्यक्रमही यावेळी जाहिर केला.

 

Exit mobile version