Marathi e-Batmya

मनोज जरांगे पाटील यांची घोषणा, आपल्याला संपविणाऱ्यांना संपवायचाय…

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकवेळा राज्य सरकारला विविध मार्गांनी आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र राज्य सरकारने दिलेली मागणी पूर्ण करत नसल्याचे दिसताच निवडणूकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार आज सकाळपासून अनेक राजकिय जाणकार, अभ्यासक आणि विविध क्षेत्रातील व्यावसायिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर मराठा समाजाच्या उमेदवारांना अर्ज भरा असे जाहिर सांगत २९ तारखेला कुठले अर्ज मागे घ्यायचे ते सांगणार आणि तिथल्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे सांगणार असल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाच्या विरोधात सरळसरळ दंड थोपटत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

निवडणूकशी संबधित जाणकारांसोबत बैठक झाल्यानंतर विधानसभेसाठी मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे की नाही याविषयीचे मत जाणून घेतले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा करत म्हणाले की, आपल्याला ज्यांनी संपवायचा प्रयत्न केला त्यांना संपवायची वेळ आली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील त्या ठिकाणी उमेदवार उमेदवार द्यायचे, तसेच जर तो मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव असेल तर मतदारसंघात मराठा उमेदवारी अर्ज भरू नका मात्र तो उमेदवार जर आपल्या विचारांचा असेल तर भले तो कोणताही पक्षाचा असेल त्याला मदत करायची असे सांगत मग त्या ठिकाणी आपला उमेदवार उभा करायचा नाही. मात्र त्या उमेदवाराकडून ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला पाठिंबा देणार असल्याचे लिहून घ्यायचे अशी घोषणा केली.

पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणत्या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून येऊ शकतो हे, आणि कोणत्या मतदारसंघात दलित-मुस्लिम मतदार एकत्र आहेत हे पाहणार आहे. मात्र तुम्ही तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरून ठेवा, अर्ज मागे घ्यायच्या दिवशी मी सांगेल की कोणत्या मतदारसंघातून अर्ज मागे घ्यायचा आणि कोणत्या मतदारसंघात अर्ज ठेवायचा. पण उमेदवारी अर्ज भरा मी सगळं गणित जुळवून आणतो असे सांगत मराठा समाजाचे उमेदवार उतरवित असल्याचे जाहिर केले.

गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना मराठा आरक्षणाच्या मागणी करत होते. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर मराठा समाजाला आरक्षण नाही दिल्यास सत्ताधाऱ्यांच्या जागा पाडणार असल्याची घोषणा करत मराठा समाजाचे उमेदवार देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीत उमेदवार उतरविण्याचा निर्णय जाहिर केला. तत्पूर्वी मराठा समाजाचे उमेदवार उतरवायचे की नाही हे उपस्थित मराठा समाजाला हात उंचवून मत व्यक्त करायचे की नाही असे आवाहन करून मराठा समाजाची मतं जाणून घेतली.

Exit mobile version