मराठा आरक्षणप्रश्नी आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले. परंतु मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चवथ्या दिवसापासून ढासळायला सुरुवात झाली. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना सलाईन लावण्यात आली. मात्र दोन दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपचाराला नकार दिला. त्यामुळे अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणी प्रश्नी मुदत मागत उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याकरीता उपोषणाचे आंदोलन स्थगित केले.
राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे आदी गेले होते.
मनोज जरांगे पाटील यांनी या वर्षी एप्रिलमध्ये सूचित केल्यानुसार ८ जून रोजी आमरण उपोषण सुरू केले. यावेळीही मराठा आरक्षण न दिल्यास ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढविणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी करत राज्य सरकारला इशारा दिला. तत्पूर्वी या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारने ४ जूनपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर आपण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते.
मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडी आणि विरोधी महाविकास आघाडी या दोघांवरही “काहीच करत नाही” अशी टीका जरांगे पाटील यांनी केली होती. राज्य सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते की, राज्य सरकारने आमची दिशाभूल केली आहे. महायुतीने आम्हाला मराठा आरक्षण दिलेले नाही…महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारविरोधात आंदोलन करत आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, महाराष्ट्र सरकारने, विशेष विधानसभेच्या अधिवेशनात, महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने (MBCC) सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मराठ्यांना १० टक्के आरक्षण वाढवण्याचे विधेयक मंजूर केले.
मनोज जरांगे पाटील यांनी या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सरकारविरोधात १७ दिवसांनी उपोषण सोडले होते. मात्र, मनोज जरंगे पाटील यांनी आरक्षणाला विरोध करत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात कोट्याचा आग्रह धरला. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण मोहिमेला ‘राजकीय सहकाऱ्यांकडून’ आर्थिक पाठबळ मिळाल्याचा आरोप आहे आणि त्यांनी प्रचारादरम्यान भडकाऊ वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सलाईनमध्ये विष टाकून संपवण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला होता. मनोज पाटील यांच्या दाव्याला उत्तर देताना महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख आशिष शेलार म्हणाले की, मनोज जरांगे पाटील काहीही बोलत असले तरी ते खोटे आरोप करत आहेत, ते लोकांची दिशाभूल करत आहेत.”
