Marathi e-Batmya

अखेर भरत गोगावलेंना मिळाले मंत्री पद, पण दर्जा दिलेले महामंडळाचे अध्यक्ष पद

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात आपल्याला नक्की कॅबिनेट मंत्री पद मिळणार आणि रायगडचा पालकमंत्री मीच असणार असा दावा रायगडमधील आमदार आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले हे सातत्याने जाहिररित्या बोलत होते. मात्र राज्यातील सरकार जाण्याची वेळ आल्यानंतर शिंदे गटाच्या भरत गोगावले यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा दिलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देऊ केले असून त्यासंदर्भातील शासन निर्णयही राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्याच्या शिंदे गटाच्या कळपात भरत गोगावले हे सर्वात पहिले आघाडीवर होते. ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत गुजरातमार्गे गुवाहाटी, गोवा आणि मार्गे शिंदे गटासोबत प्रवास केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये स्थान न मिळाल्याने भरत गोगावले यांना भाजपा प्रणित एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये तरी मंत्रीपदी वर्णी लागेल अशी आशा होती. तसेच मंत्रीपदासाठी नवा कोटही शिवल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात चांगलीच रंगली होती.

याशिवाय राज्याच्या राजकारणात सत्ताधारी महायुतीत सहभागी होण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते असताना अधिवेशन काळात अजित पवार यांच्या भाषणात सातत्याने व्यत्यय आणत होते. त्यावेळी अजित पवार यांनीही भर विधानसभेत एकदा नव्हे तर दोनदा म्हणाले होते की, माझ्या भाषणात जितक्या वेळ्या अडथळे आणाल तितका उशीरा तुम्हाला मंत्री पद मिळण्या होईल अशी ताकिद वजा इशाराही दिला होता. अखेर अजित पवार यांनी एक वर्षापासून सत्तेत आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला २ वर्षे पूर्ण होत आले आहेत. मात्र भरत गोगावले यांना काही मंत्री पदही मिळाले नाही की, रायगडचे पालकमंत्री पदाही मिळाले नाही.

आता राज्यात विद्यमान विधानसभेची मुदत संपण्यास काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना भरत गोगावले यांना एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. मात्र वास्तविक पाहता महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात येतो. परंतु भरत गोगावले यांना मंत्री पद देता आले नाही मात्र किमान मंत्री पदाचा दर्जा देण्यात आलेले एसटी महामंडळाचे अध्यक्ष पद देत भरत गोगावले यांची बोळवण त्यांच्याच पक्षाच्या मुख्यमंत्री शिंदे केली. मात्र एक खरे की राज्यात सत्ता कोणाचीही का असेना अजित पवार यांचा शब्द मात्र अंतिम ठरत असल्याची चर्चा महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

Exit mobile version