Marathi e-Batmya

आमदार रईस शेख यांची माहिती, मुख्य सचिवांचे पोलिसांना आदेश, वाहने अडवणाऱ्यावर कारवाई करा

२८ मे रोजी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूक करणाऱ्या वाहने अडवणाऱ्या स्थानिक गुंडांवर कठोर कायदेशीर करण्यात यावी. तसेच प्रमाणापेक्षा जास्त जनावरांची वाहतूक केल्याबद्दल जनावरांच्या व्यापाऱ्यावर कारवाई करणे बेकायदा आहे, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी पोलीसांना दिल्या आहेत, अशी माहिती समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचे सर्वपक्षीय आमदार, राज्य खाटीक महासंघाचचे प्रतिनिधींची मंगळवारी मंत्रालयात प्रशासन आणि पोलीस प्रशासनाबरोबर बैठक झाली

आमदार रईस शेख पुढे बोलताना म्हणाले की, बकरी ईद निमित्ताने देवनार कत्तलखान्यामध्ये कत्तलीसाठी २०० रुपये असणारे शुल्क २० रुपये करण्यात आले आहे. तसेच मुंबईमध्ये कुर्बानीसाठी ७० ठिकाणे होती, ती आता १०९ करण्यात आली आहेत. तसेच काही गृहनिर्माण संस्थाना कुर्बानी साठी यापूर्वीच परवाने दिलेले आहेत. कुर्बानीसाठी दुकानदारांनाही  परवानगी देण्यात आली आहे.

पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, शेळ्या -मेंढ्याना टॅगिंग असल्याशिवाय त्यांची खरेदी -विक्री करण्यास मनाई आहे. मात्र बकरी ईदच्या निमित्ताने त्यामध्ये सवलत देण्यात यावी. टॅगिंग नसणारी शेळीमुंडी वर जनावरे सुद्धा खरेदी करण्यास परवानगी असणार आहे, अशा सूचना मुंबई महानगरपालिका आणि राज्याच्या पशुसंवर्धन विभागाला मुख्य सचिवांनी या बैठकीमध्ये दिल्या असल्याचे सांगितले.

मंत्रालयातील समिती सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था ),पशुसंवर्धन व दुग्धविकास, ग्रामविकास आणि सहकार व पणन या विभागांचे प्रधान सचिव प्रत्यक्ष तसेच राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त दूरदृष्टी प्रणाली द्वारे उपस्थित होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल होते.

बैठकीला समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख, आमदार अबू आझामी, आमदार अस्लम शेख, आमदार सना मलिक, आमदार झिशान सिद्दीकी तसेच ऑल इंडिया खाटीक संघटनेचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

Exit mobile version