Marathi e-Batmya

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची माहिती, एकल महिला धोरणासाठी मसुदा समिती गठीत

राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सांगितले.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, राज्यातील विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित तसेच एकट्याने संसाराचा भार सांभाळणाऱ्या महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. यासाठी महिला व बाल विकास विभागाने मसुदा समिती गठीत केली असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेनुसार या धोरणासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये एकल महिलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्या आधारे सक्षमीकरणासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे सांगितले.

मेघना साकोरे-बोर्डीकर पुढे बोलताना म्हणाल्या की, या समितीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचविणार असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, राज्यातील एकल महिलांना सन्मानाने जगता यावे, त्यांना शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासन कटिबद्ध आहे. हे धोरण महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. समितीचे कामकाज व समन्वय महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

Exit mobile version