Marathi e-Batmya

नाना पटोले यांचा आरोप, खासगी खाणीकडून ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर रद्द करा’ ‘मित्रों’च्या फायद्यासाठी महाग वीज कशासाठी?

भाजपा सरकार जनतेला दररोज महागाईचा शॉक देत आहे. साखरेपासून सर्वच्या वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. सर्वात जास्त महागाई महाराष्ट्रात आहे आणि आता वीज दरवाढीचा शॉक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशासाठी महाजनकोने ३० लाख मेट्रीक टन कोळसा खरेदीचे टेंडर काढले असून हा कोळसा मोदी-शाह यांच्या मित्रोंच्या खाणीतून घेतला जाणार आहे. हा महागडा कोळसा खरेदी केल्यास वीजेचे दरही वाढतील, त्यामुळे हे टेंडरच रद्द करा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, आम्ही मागील आठवड्यात कोळशाचा मुद्दा उपस्थित केला होता आता सरकारने आणखी एक टेंडर काढले आहे. ३० लाख मेट्रीक टन कोळशाचे हे टेंडर आहे. आपण डब्लूसीएल WCL कडून चांगल्या प्रतीचा व कमी दरातील कोळसा खरेदी करत होतो, हाच कोळसा गुजरात व कर्नाटकला सुद्धा जातो पण पंतप्रधानांच्या मित्रोंला फायदा पोहचवण्यासाठी हे टेंडर काढले आहे. टेंडरमध्ये स्पर्धा असेल तर कमी दरात कोळसा खरेदी करता येतो व त्याचा फायदा जनतेला होतो, पण आता ही स्पर्धाच ठेवली नसून थेट खास व्यक्तीच्या खाणीतून हा कोळसा खरेदी केला जाणार आहे. स्पर्धा संपल्याने महागडा व कमी दर्जाचा कोळसा घ्यावा लागणार आहे. कोल वॅाशरीकडे ५ लाख मेट्रीक टन कोळसा पडून आहे, तो कोळसा सरकार का घेत नाही. सरकार महाग व कमी दर्जाचा कोळसा खरेदी करणार व नंतर वीजेचे दर वाढणार, ही जनतेची लूट आहे. ती थांबली पाहिजे यासाठी हे टेंडर रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशाराही दिला.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. महाराष्ट्रातील ३३ मोठे उद्योग बाहेर गेले आहेत, त्याला कारण महाराष्ट्रातील महागडी वीज आहे. गुजरात व कर्नाटकात आपल्यापेक्षा कमी वीज दर आहेत. उद्योग राज्याबाहेर गेल्याने त्याचा फकटा आपल्याला बसतो, बेरोजगारीत वाढ झाली आहे, असेही सांगितले.

पंतप्रधानांकडून जीडीपी GDP चे खोटे आकडे..

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, देशाचा जीडीपी GDP ७.८ टक्के असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ VDO सोशल मीडीयावर टाकून केला आहे. पण पंतप्रधानांनी सांगितलेला जीडीपी  GDP चा दर खोटा असल्याचे या विषयातील तज्ञच सांगत आहे. देशात महागाई प्रचंड वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, शेती संकटात आहे मग जीडीपी GDP वाढला कसा? असा प्रश्न उपस्थित करत खोटे आकडे सांगून पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केली असल्याचा आरोपही यावेळी केला.

Exit mobile version