Marathi e-Batmya

शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल

मराठी ई-बातम्या टीम
दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या संकल्पनेतून आज साखराळे गावी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम घोषित केला होता. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस सेवादलामार्फत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा संवाद उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

आज साखराळे गावातील बैठकीत कार्यकर्त्यांनी विविध सूचना केल्या त्याची दखल घेत त्यावर उपाययोजना करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
बारावीची परीक्षा ऑनलाइन की ऑफलाईन या मुद्द्यावरून विरोधकांनी मुलांची मने कलुषित करण्याचा प्रकार सुरू केला आहे. काही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना लीडर बनवत महाविकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने केली जात आहेत. मात्र मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जाणून-बुजून रासायनिक खतांच्या किंमती वाढवत शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. उत्तरप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालण्यात आल्या. देशभर शेतकरी विरोधी भूमिका आपण सातत्याने अनुभवल्या आहेत याची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली.

राज्यात सत्तांतर झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्याच्या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सातत्याने विविध अभिनव प्रयोग राबवित आहेत. कधी संवाद परिवार यात्रा तर कधी अन्य कार्यक्रमाच्या माध्यमातून जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न सुरु केला. आता नव्याने एक तास राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा नवा उपक्रम सुरु केला आहे. हे सगळे विविध उपक्रम राबवून आगामी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या किमान १०० जागा तर लोकसभेच्या १० हून अधिक जागा निवडूण आणण्याची जयंत पाटील यांची रणनीती असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version