Marathi e-Batmya

रोहित पवार यांच्या वाघाच्या “त्या” पोस्टमुळे राजकिय चर्चांना उधाण

राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबातील नव्या चेहऱ्याचा अर्थात रोहित पवार यांचा प्रवेश झाल्यानंतर राज्यातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेलेल्या आहेत. त्यांच्याबद्दलची उत्सुकता अनेकांना आहे. त्यामुळे ते सार्वजनिक ठिकाणी कसे वावरतात, भाषणा दरम्यान काय बोलतात याकडे त्यांच्या मतदारसंघातील नागरीकांबरोबरच राज्यातील अनेकांचे लक्ष असते. आज धुळवडीच्या निमित्ताने रोहित पवार हे आपल्या कुटुंबासमवेत बाहेर फिरायला गेल्यानंतर वाघाच्या अनुषंगाने एक पोस्ट समाजमाध्यमावर केली असून त्यांच्या या पोस्टची चर्चा चांगलीच रंगली आहे.

एकीकडे सत्ताधारी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत असताना विरोधकही भ्रष्ट्राचाराची प्रकरणं बाहेर काढत प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज धुळवडीचा सण असतानाही राज्यातील नेत्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर आरोप आणि टीका करण्याची संधी सोडली नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी वाघाचा संदर्भ देत मुलांशी झालेल्या चर्चेचा थोडक्यात घोषवारा दिला आहे. मात्र त्या चर्चेत राज्याच्या राजकिय परिस्थितीची छाप आहे.

रोहित पवार मुलांसोबत वाघ पाहण्यासाठी गेले होते. यावेळी वाघ दिसल्यानंतर त्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून हा क्षण शेअर केला असून यानिमित्ताने राजकीय भाष्यदेखील केले.

रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये लिहितात, “जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली. साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही? असे विचारले. मी त्यांना म्हणालो, वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो. म्हणूनच आपणही वाघासारखेच राहायचे असते आणि प्रामाणिकपणे काम करताना कोण काय म्हणते याकडं ढुंकूनही बघायचं नसते. हत्तीसुद्धा रस्त्याने जात असताना आजूबाजूला ओरडणाऱ्यांकडे लक्ष देत नसतो. हे ऐकून मुलेही म्हणाली, “महाराष्ट्रही असाच आहे ना बाबा!”

राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील दोन मंत्री सध्या तुरुंगाची हवा खात असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तितक्याच जोरकसपणे भाजपाला प्रत्युत्तर देण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यामुळे वाघ हा शिवसेनेचे प्रतिकात्मक रूप असले तरी रोहित पवार यांच्या या पोस्टमधून राष्ट्रवादी काँग्रेसच वाघ असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत तर नाही ना अशी शक्यता राजकिय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

त्यातच आज भाजपाच्या नेत्यांनी शरद पवारांवर आज टीकेची झोड उठविली असतानाही शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे वाघाचा व्हिडिओ पोस्ट करत शरद पवार वाघ आहेत असे तर रोहित पवारांना सूचित करायचे नाही ना? अशी चर्चाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु झाली आहे.

 

Exit mobile version