Marathi e-Batmya

सुप्रिया सुळे यांचा सवाल, पण सिटी स्मार्ट झाल्या का?

पक्षासाठी केसेस अंगावर घेतात त्या सर्व युवकांचे आभार सुरुवातीलाच आपल्या भाषणात खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी मानले. राजकारणात चांगली पॉलिसी यावी म्हणून मी संसदेत काम करत आहे, टीका करायची तेव्हा नक्की करतो पण पॉलिसीवर आम्ही जास्त लक्ष देतो असे सांगतानाच ५० हजार कोटी रुपये स्मार्ट सिटीवर खर्च केले तर जवळपास एक लाख कोटी रुपये खर्च झाले मग या स्मार्ट सिटी झाल्या का? याची चौकशी होण्याची आवश्यकता असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

रामाला आम्ही कधीच विसरलो नाही तो आपला अविभाज्य भाग आहे. हा पक्ष जमीनदारांचा नाही हा सर्व कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे व्यासपीठावर येऊन आपल्यावर कोण टिका करत असेल तर ते आम्हाला पटणार नाही अशा शब्दात आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रलोभन आणि धाक सध्या वाढत आहे. मिडिया व राजकीय लोकांचे चांगले संबंध असतात. त्यांच्यामध्ये डॉयलॉगचे नाते असावे प्रलोभन व धाकाचे नसावे असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता लगावला.
बंडखोर आमदारांवर ५० खोक्यांचा आरोप झाला त्यावेळी ५० खोके घेतले नाही याबाबत कुठल्याही आमदारांनी खुलासा केला नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे असे सांगत त्या पुढे म्हणाल्या राष्ट्रवादीकडून तयार थिंक टँक दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. आमच्या पक्षाच्या टॅलेंटवर ते पक्ष वाढवत आहेत. १०५ पैकी ५० आमदार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे आहेत असा थेट हल्लाबोलही त्यांनी केला.

आम्ही एंटरटेनर नाही आम्ही पॉलिसीमेकर आहोत. आम्ही संसदेत पॉलिसीवर काम करतो त्यामुळे चॅनेलवाले अजेंडा ठरवतात आणि आपण बोलतो. पण यापुढे आपण अजेंडा ठरवुया आणि त्यांनी त्यावर बोलले पाहिजे. आपण प्रतिक्रिया दिली नाही म्हणून अडचण येत नाही असे स्पष्ट मतही त्यांनी यावेळी मांडले.

लढेंगे और जितेंगे भी..असे सांगतानाच सध्या असंवेदनशील राजकारण सुरू आहे. येत्या काळात आपल्याला याविरोधात लढायचे आहे यासाठी तयार रहा असे आवाहनही करत त्या पुढे म्हणाल्या, आठ वर्षांत काय केले ते तरी सांगा असा थेट सवाल मोदींना करतानाच या बागुलबुवातून बाहेर पडूया, आपण केलेले काम जनतेला सांगु या. यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवुया… त्यांचे स्वप्न पूर्ण करुया. आपला पक्ष पूर्ण ताकदीने सत्तेत कसा येईल आणि राज्यात आणि देशात एक नंबरचा पक्ष कसा होईल यासाठी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version